समृध्द लोकशाहीसाठी मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी व्हा - जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह

बापुजी अणे महिला महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान
यवतमाळ, दि. 21 : सामान्य नागरिक हा भारतीय लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. ही व्यवस्था आपल्यासाठी आहे. लोकशाहीची व्याप्ती खुप मोठी असून या माध्यमातून आपण आपला विकास करू शकतो. त्यामुळे देशाच्या समृध्द लोकशाहीसाठी तरुण-तरुणींनी  मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालयात आयोजित मतदार जनजागृती  व नोंदणी कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिवाकर पांडे तर मंचावर उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ, नायब तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी रुपाली देहाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे उपस्थित होते.
लोकशाहीमध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांनाही समान अधिकार आहेत. शासन, प्रशासन स्तरावर महिलांना प्राधान्य दिले जाते. मात्र मतदार नोंदणी प्रक्रियेत महिलांची संख्या कमी पडत आहे. या महाविद्यालयात दोन हजार विद्यार्थीनी शिक्षण घेतात. या सर्व मुलींचा आवाज लोकशाहीत बुलंद होऊ शकतो. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण सजिव आहोत, निर्जिव नाही, याची जाणीव ठेवा. आजच्या जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी मतदार नोंदणी केली तर निवडणुकीत होणारे गैरप्रकारला आळा बसू शकतो. यातूनच आपली लोकशाही अधिक समृध्द होईल. केवळ आपणच नाही तर आपल्या परिसरातील आजुबाजूंच्या नागरिकांनासुध्दा मतदानाचे महत्व, लोकप्रतिनिधींबाबत सजगता आदी गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे. एकदा निवडून दिले की आपली जबाबदारी संपली असे होत नाही. नागरिक म्हणून किंवा मतदार म्हणून आपली भुमिका महत्वाची आहे. केवळ लोकशाहीला नावे ठेवून हे होणार नाही. तर या प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. निवडणुकीत काही गैरप्रकार होत असले तर आज किती नागरिक त्याची माहिती प्रशासनाला देते, याचाही विचार होणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.  
विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करून आपले ध्येय गाठले पाहिजे. चांगल्या गोष्टींचा नेहमी आग्रह धरा.  विद्यार्थ्यांना विविध प्रश्न पडायला पहिजे. त्याच्या उत्तरातूनच आपला विकास होतो. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या तरुण – तरुणींनी मतदार नोंदणीचा फॉर्म क्रमांक 6 त्वरीत भरून येणा-या सर्व निवडणुकांत आपला मूलभूत हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. यावेळी जिल्हाधिका-यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसीलदार सचिन शेजाळ म्हणाले, सर्व पात्र मतदारांची नोंदणी करण्याचा निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आहे. निवडणुकीत अनेक प्रलोभने दिली जातात. या गोष्टींना आळा घालायचा असेल तर युवक-युवतींनी समोर आले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे. यावेळी जयश्री पठाडे, निकिता मोहतुरे यांनी जिल्हाधिका-यांकडे आपले मतदार नोंदणीचे अर्ज सादर केले. तसेच आणखी मतदार नोंदणी करण्यासाठी या विद्यार्थ्यीनींना जिल्हाधिका-यांच्या हस्ते मतदार नोंदणी अर्जाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. संचालन प्रा. ममता दयणे यांनी तर आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे यांनी मानले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय समन्वयक प्रा. सरकटे, प्रा. तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होत्या.    
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी