शेतकऱ्यांना अधिग्रहणाचा अधिक मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करणार - महसूल राज्यमंत्री संजय राठोड



दिग्रस तालुक्यातील शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाबाबतच्या प्रमाणपत्राचे वाटप
यवतमाळ, दि. 15 : वर्धा – नांदेड रेल्वे मार्ग यवतमाळ जिल्ह्यातून जात आहे. यासाठी‍ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातून रेल्वे जात आहे, याचा आनंद शेतकऱ्यांनासुध्दा आहे. मात्र त्यांना अधिक मोबदला मिळाला तर तो आनंद द्विगुणीत होईल. या रेल्वे प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत होत आहे त्यांना अधिक मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.
दिग्रस येथील तहसील कार्यालयात जमीन अधिग्रहणाबाबतच्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुसदचे उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी नितीनकुमार हिंगोले, रेल्वेचे अधिकारी तायडे उपस्थित होते.
महसूल राज्यमंत्री संजय राठोड म्हणाले, प्रगतीसाठी रेल्वे आवश्यक आहे. मात्र शेतकऱ्यांवर अन्याय न होता त्या प्रमाणात भुसंपादनाचा मोबदला मिळाला पाहीजे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या काही तक्रार असल्यास संबंधित विभागाने सर्व तक्रारी एकत्रित करून प्रस्ताव पाठवावा. मा.मुख्यमंत्री व संबंधित विभागासोबत चर्चा करून योग्य मोबदल्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच जिल्ह्यात विविध विकास कामांसाठी होणाऱ्या भुसंपादन व त्याचा योग्य मोबदला याबाबत जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.  
दिग्रस तालुक्यात या प्रकल्पासाठी 13 गावांतील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत होत आहे. यापैकी काटी, रुई तलाव व नांदगव्हाण येथील शेतकऱ्यांना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते जमीन अधिग्रहणाबाबतचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यात काटी येथील शेतकरी राजेश्वर पडगीलवार, रुई तलाव येथील बधु राठोड आणि दशरथ पाचोरे तर नांदगव्हाण येथील पांडुरंग खुरसडे, सुधीर देशमुख, मिर्झा अफजल बेग, मिर्झा फैजल बेग यांचा समावेश होता. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी, तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी