स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते 18 कोटींच्या विकासकामांचे भुमिपुजन







v वातानुकूलित अभ्यासिका, सिंथेटिक ट्रॅक, अत्याधुनिक तारांगण,
शवविच्छेदन गृहाचे विस्तारीकरण यांचा समावेश
यवतमाळ, दि. 16 : जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी आदींच्या मुलभूत विकासासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री मदन येरावार यांनी 18 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भुमिपूजन केले. यात विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित अभ्यासिका, नागरिकांसाठी सिंथेटिक ट्रॅक, खगोलशास्त्रात आवड असणा-या विद्यार्थी आणि नागरिकांसाठी तारांगण तसेच मृत कुटुंबियांची गैरसोय टाळण्यासाठी शवविच्छेदन गृहाचे विस्तारीकरण यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांसाठी पाच कोटींची अभ्यासिका : वैशिष्ट्यपूर्ण  कामांसाठी विशेष अनुदान अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाळेत पाच कोटी रुपयांच्या अभ्यासिका बांधकामाचे भुमिपूजन करतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, हे स्पर्धेचे युग आहे. परिस्थितीशी झुंजत असतांना गोर-गरीब कुटुंबातील जे विद्यार्थी स्पर्धा परिक्षेचे महागडे कोचिंग क्लासेस लावू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका आहे. प्रशासनाच्या माध्यमातून देश चालविला जातो. त्यामुळे यवतमाळमधील विद्यार्थीसुध्दा प्रशासनातील महत्वाचा एक घटक असावा. या अभ्यासिकेत प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. केंद्र व राज्य लोकसेवा आयोग यांच्यासह बँकीक व इतर सर्व स्पर्धा परीक्षेची येथे तयारी करता येईल.
विशेष म्हणजे अंध विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सोयसुध्दा येथे करण्यात आली आहे. तळमजल्यावर 10 अंध विद्यार्थ्यांकरीता ब्रेललिपी व संगणकीय उपकरणाने परिपूर्ण व  अद्ययावत बाबींनी सुसज्ज अभ्यासिका सदन, पहिल्या मजल्यावर 50 विद्यार्थ्यांकरीता सुसज्ज अभ्यासिका सदन, दुस-या मजल्यावर 120 आसनांचे सेमिनार हॉल, विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक लायब्ररी तसेच आधुनिक डिजीटल ई- लायब्ररी, आर.ओ. वॉटर फिल्टर युक्त पाणी व्यवस्था व प्रसाधनगृहाची व्यवस्था आदी गोष्टी येथे उपलब्ध करून दिल्या जातील. या अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
यावेळी आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, स्थायी समिती सदस्य रेखा कोठेकर, शिक्षण सभापती निता केळापुरे, नगरसेवक विजय खडसे, सुजीत रॉय, माया शेरे, जगदीश वाधवाणी, नितीन गिरी, चंद्रभागा मडावी, रिता धावतोंडे, संगिता राऊत, राजू डांगे, न.प.मुख्याधिकारी अनिल अढागळे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर आदी उपस्थित होते.
क्रीडा संकूल येथे सात कोटींचा सिंथेटिक ट्रॅक व फुटबॉल मैदान : नेहरू स्टेडीयम येथील क्रीडा संकूलात 6.83 कोटी रुपये खर्च करून 400 मीटर लांबीचा सिंथेटिक ट्रॅक व फुटबॉल मैदान तयार करण्यात येणार आहे. या कामाचे भुमिपूजन करतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, यवतमाळ हा शुरवीर, मेहनती व धाडसी युवकांचा जिल्हा आहे. येथील खेळाडूंना अत्याधुनिक सोयी तसेच उच्च दर्जाचे सिंथेटिक ट्रॅक व फुटबॉल मैदान लवकरच उपलब्ध करून दिले जाईल. या मैदानावर उत्कृष्ट खेळाडू घडावे, अशी यवतमाळकरांची इच्छा आहे. सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. नोकरी, पॅकेज यामध्ये विद्यार्थी अडकला आहे. विद्यार्थ्याने उत्कृष्ट नागरिक म्हणून घडणे आवश्यक असून स्वत:तील स्पोर्टस्‍मन जागा ठेवावा. दर्जेदार सुविधा मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनीसुध्दा जिल्ह्याचे नाव राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
या क्रीडा संकूलात आंतराष्ट्रीय ॲथलिटिक्स फेडरेशनच्या मानकानुसार 400 मीटर लांबीचा सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल मैदानाची निर्मिती करून त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्फ लॉन, सिंथेटिक ट्रॅक व फुटबॉल मैदानाच्या बाजूस काँक्रीट गटारे, मैदानावर पाणी शिंपडण्याकरीता स्प्रिंकलर व पाईपलाईनची तरतुद आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी नगरसेवक अमोल देशमुख, अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, ॲथलेटिक संघटनेचे अध्यक्ष जीवन मिसकीन, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते विलास इंदुरकर आदी उपस्थित होते.
नेहरू उद्यान परिसरात तारांगण : नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत अनुदान निधीतून नेहरू उद्यान येथे बांधण्यात येणा-या तारांगण बांधकामाचे भुमिपूजन करतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, खगोलशास्त्रात आवड असणा-या विद्यार्थी व नागरिकांसाठी शहराच्या मध्यभागी तारांगण उभे राहत आहे. वैज्ञानिकदृष्ट्या अनेकांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे. ब्रम्हांड, आकाशगंगा, अंतराळ आदी शब्द आपण वाचले किंवा ऐकले असतात. मात्र आता शहरात तयार होणा-या या तारांगणमुळे ते प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे. हे तारांगण अतिशय अत्याधुनिक राहणार आहे. शहराच्या विकासात मुलभूत सुविधा तर आहेच पण स्मार्ट इन ऑल आस्पेक्ट विकास करण्यावर आपला भर आहे, असे ते म्हणाले.
यावेळी बोलतांना नगराध्यक्षा कांचन चौधरी म्हणाल्या, यवतमाळ शहरासाठी ही एक पर्वणी आहे. यवतमाळच्या सौंदर्यात या तारांगणामुळे भर पडेल. तारांगणाचा उपयोग लहानांपासून मोठ्यांना होईल. कार्यक्रमाला नगराध्यक्षा कांचन चौधरी, बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती, डॉ. विजय अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक उपस्थित होते.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन गृहाचे विस्तारीकरण व नुतणीकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आला. 2.43 कोटींच्या या कामात शवविच्छेदन करण्यासाठी चार टेबल असून पहिल्या मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी गॅलरी राहणार आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी सुविधा व प्रसाधन गृह आणि वॉटर कुलरची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय डॉक्टर्स रुम, अटेंडन्स रुम, टेक्निशियन रुम, स्टोअर व प्रयोगशाळा आदींचा या कामात समावेश करण्यात आला आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून ई-रिक्षा चे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरवार यांच्यासह आदी डॉक्टर्स उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी