‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण



यवतमाळ, दि. 15 : राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्दिष्टाने युनिसेफ व राज्याचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे युवा माहिती दूत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्याहस्ते स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी आडे, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी.पाटील, अधिक्षक अभियंता राजेंद्र काटपील्लेवार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते.
विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय येाजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविणे हे युवा माहिती दूत उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या अंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत दुहेरी संवादातून शासनाच्या येाजना प्रभावीपणे पोहोचविण्यास समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे सहाय्य घेण्याच्या हेतूने युवा माहिती दूत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी स्वेच्छेने तयार असलेल्या किंवा निवडण्यात आलेले विद्यार्थी सहा महिन्याच्या कालावधीसाठी राज्य शासनाचे युवा माहिती दूत असतील. या कालावधीत किमान 50 प्रस्तावित लाभार्थ्यांच्या घरी जावून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासाठी लागू असणाऱ्या योजनांची माहिती देतील. युवा माहिती दूत म्हणून काम केल्यामुळे राज्य शासनाकरीता काम करण्याचे महत्वाची संधी लोकांना मिळेल. युवा माहिती दूत अशी ओळख राज्य शासनाच्यावतीने त्यांना सहा महिन्याकरीता देण्यात येईल. ठरवून दिलेले काम दिल्यानंतर या युवा माहिती दूतांना शासनाचे डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्या सहकार्याने मोबाईल ॲप तयार करण्यात आला आहे. या उपक्रमात महाविद्यालयीन युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात  आले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी