पालकमंत्र्यांच्या हस्ते शहरात फ्री वाय-फाय सेवेचा शुभारंभ


32 ठिकाणी मोफत सुविधा देण्याचे नियोजन
यवतमाळ, दि. 20 : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते शहरात फ्री वाय-फाय सेवेचा शुभारंभ करण्यात आला. ‘लव्ह यू यवतमाळ’ असे या वाय-फायचे नाव असून शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषद आणि बसस्थानक येथे 15 ऑगस्ट पासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. आगामी काळात ही सुविधा 32 ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शहरातील नागरिकांना फ्री वाय-फाय सुविधा देण्याची संकल्पना पालकमंत्री मदन येरावार यांनी मांडली. त्यासाठी राज्य शासनाचे माहिती व तंत्रज्ञान विभाग, भारत संचार निगम लिमिटेड आणि यवतमाळ नगर परिषद यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनापासून ही सेवा शहरात सुरू करण्यात आली. या सुविधेमुळे सर्वसामान्य जनतेला कॅशलेस बँकींग व्यवहार करणे, शासकीय व इतर संकेत स्थळावरील माहिती मिळविणे, ऑनलाईन अर्ज भरणे, ई-मेल पाठविणे आदी आवश्यक कामे स्वत:च्या मोबाईलवरून करता येतील.
त्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड आणि क्वॉडजेन कंपनीकडून यवतमाळ शहरात 32 हॉटस्पॉट तयार करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषद आणि बसस्थानक येथे ही सुविधा सुरू झाली असून आगामी काळात विश्राम गृह, जिल्हा परिषद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लोहारा ग्रामपंचायत, वडगाव ग्रामपंचायत, दत्त चौक, वडगाव रोड पोलिस स्टेशन, माइंदे चौक, उमरसरा, वाघापूर, पिंपळगाव, मोहा, भोसा येथील जुने ग्रामपंचायत कार्यालय, स्टेट बँक चौक, दर्डा नगर, समर्थवाडी, बालाजी सोसायटी, शनी मंदीर चौक, नारंगी नगर, मोहा ग्रामपंचायत, जुना आर्णि नाका, बाबाजी दाते कॉलेज, नेहरू स्टेडीयम, अमलोकचंद कॉलेज, शारदा चौक, मारवाडी चौक, चर्च रोड, जयहिंद चौक आणि अग्रवाल ले-आऊट येथे फ्री वाय-फाय सुरू करण्याचे नियोजन आहे.   
स्वातंत्र्यदिनी सुरू करण्यात आलेल्या ‘लव्ह यू यवतमाळ’ या फ्री वाय-फाय सुविधेच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, बीएसएनएलचे महाप्रबंधक रमेश धुलशेट्टे, उपविभागीय अभियंता शंतनु शेटे, बीएसएनएलचे श्री. मलये, श्री. नांदेश्वर, श्री. बिलोड, श्री. मेटकर, श्री. गद्रे व इतर अधिकारी उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी