वाघाडी नदी पुनरुज्जीवन राज्यासाठी पथदर्शी ठरणार





v स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात पालकमंत्र्यांचे प्रतिपादन
v जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वात अनेक महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी
यवतमाळ, दि. 16 : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्राच्या जलद विकासाचा कार्यक्रम राज्य शासनाने नुकताच जाहीर केला. या अंतर्गत वनांवर आधारीत उद्योगांना चालना देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी नदीच्या किना-यावर फळबाग व वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्याला राज्य शासनाची मंजूरीसुध्दा मिळाली आहे. राज्यात नदी पुनरुज्जीवनाचा पहिला मान वाघाडी नदीच्या स्वरुपात यवतमाळ जिल्ह्याला मिळाल्यामुळे हा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरणार, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी.पाटील, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते.
‘रॅली फॉर रिव्हर’ या उपक्रमांतर्गत राज्य शासन आणि इशा फाऊंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून वाघाडी नदीचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, यासाठी 985 कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. वाघाडी नदी ही यवतमाळ, घाटंजी आणि कळंब तालुक्यातील 39 गावांतून वाहते. या तिन्ही तालुक्यातील जवळपास 30 हजार हेक्टरवर फळझाडे लावण्याचे नियोजन आहे. या  प्रकल्पातून शेतक-यांचे जीवनमान उंचाविण्याचा, त्यांचे उत्पन्न पाच पटीने वाढविण्याचा प्रयत्न आहे. राज्य शासनाने विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी 22 हजार 122 कोटी रुपयांचा विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. याचा श्रीगणेशा चिंतामणी नगरी कळंब शहराच्या विकासासाठी  10 कोटी रुपयांचा निधी देऊन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे पालकमंत्री म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यात 100 बचत गटातील 1 हजार लाभार्थ्यांना सुधारीत देशी जातीचे 100 कुक्कुटपक्षी 50 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येईल. मत्स्यव्यवसाय विकास शेती अंतर्गत जिल्ह्यात मत्स्यखाद्य युनिट तर कौशल्य विकास व रोजगार निर्मिती अंतर्गत महिला कृषी सेवा केंद्र स्थापन करण्याचे नियोजन आहे. उमरखेड येथील महिला बचत गटाच्या हळद प्रक्रिया केंद्राच्या धर्तीवर जिल्ह्यात अन्य ठिकाणी असे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. पर्यटन विकासांतर्गत टिपेश्वर येथे मार्गस्थ सुविधा विकसीत करण्यासाठी विशेष कार्यक्रमात 5.25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. किटकनाशक फवारणीच्या घटना टाळण्यासाठी आणि विषबाधा झालेल्या रुग्णांच्या त्वरीत निदानाकरीता वैद्यकीय महाविद्यालयात टॉक्सीकॉलॉजी केंद्रासाठी 10 कोटी रुपये मंजूर झाले आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयात 50 रुग्णखाटांचे अद्ययावत एनआयसीयू उभारण्यात येणार आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील चार रुग्णालयांचा नव्याने समावेश झाल्याने रुग्णालयांची संख्या आता 13 झाली आहे. बांधकाम कामगारांसाठी असलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजनेत यवतमाळ जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. एक महिन्याच्या विशेष कामगार नोंदणी अभियानात जिल्ह्यात 26 हजार 500 कामगारांनी तर आतापर्यंत एकूण 47 हजार 500 कामगारांनी नोंदणी केली आहे. जिल्हा स्तरावर विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गाच्या मुलींसाठी तसेच वर्किंग वुमनसाठी उमरसरा येथे 4 हजार चौरस मीटर जागेवर नवीन वसतीगृह बांधण्यात येणार आहे.
शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणले, जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासन भरीव कामगिरी करीत आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेत 150 टक्के लक्षांक पूर्ण करणारा यवतमाळ राज्यातील एकमेव जिल्हा आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 6700 शेततळे पूर्ण झाली आहे. कृषी समृध्दी प्रकल्प व टाटा ट्रस्टच्या माध्यमातून जिल्ह्यातील 1 हजार शेततळ्यांमध्ये मत्स्यशेती प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यात गत सहा महिन्यात धडक आणि नरेगाच्या 4588 विहिरी पूर्ण झाल्या आहेत. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 101 प्रकल्पातून  10.73 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. नागपूर - बोरी – तुळजापूर राष्ट्रीय राजमार्गाचे जिल्ह्यातील 206 कि.मी. चे काम प्रगतीपथावर आहे. हायब्रिड ॲन्युटी अंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 1200 कोटी रुपयांच्या निविदांना मंजूरी देण्यात आली आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी जिल्ह्यातील 91 टक्के जमीन संपादीत करण्यात आली असून भु-धारकांना 338 कोटी 33 लाखांचे वाटप करण्यात आले आहे.
पाणी फाऊंडेशन अंतर्गत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या सहा तालुक्यातील गावक-यांनी 1600 कोटी रुपयांचा जलसाठा निर्माण केला आहे. 13 कोटी वृक्ष लागवडीत ज्याप्रमाणे नागरिकांनी सहभाग घेतला तसाच पुढाकार वृक्ष संवर्धनासाठी घ्यावा. तसेच शेतकरी बांधवांनी किटकनाशक फवारणी करतांना सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणारे अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्यासह उत्कृष्ट कार्य करणारे राज्य परिवहन महामंडळाचे वाहक गिता श्रीवास, रुख्मा मानवटकर, विठ्ठल माटे, चालक राजेंद्र मांडवे, अविनाश आंबेकर, तसेच स्वच्छ भारत मिशनचा पुरस्कार करणारे शिवचरण साहू, लघु उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे उज्वला आयुर्वेदाश्रमचे चंद्रकांत उके, जगदंबा कॉटन पार्कचे पवन बजाज, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत प्राविण्य मिळविणारा पुसद येथील पियुष डांगे, पहिल्या श्रेणीत दहावी उत्तीर्ण झालेली बहुरुपी समाजातील विद्यार्थीनी जया शिंदं, शिक्षिका शुभांगी आवारी यांचा स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन चंद्रबोधी घायवटे, डॉ. ललिता जतकर यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय, वरीष्ठ अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी