नागरिकांना गतिमान सेवा देण्यावर भर - पालकमंत्री मदन येरावार




v मेटीखेडा येथे अप्पर तहसील कार्यालयाचे उद्घाटन
यवतमाळ, दि. 16 : गावखेड्यातील नागरिकांना अनेक कामांसाठी तहसील कार्यालयात जावे लागते. कळंब तालुक्याची लोकसंख्या, एकाच तहसील कार्यालयात होणारी गर्दी आणि नागरिकांना होणारा त्रास हे सर्व लक्षात घेता मेटीखेडा येथे अप्पर तहसील कार्यालयाची आवश्यकता होती. या कार्यालयातून नागरिकांना गतिमान सेवा देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
मेटीखेडा (ता. कळंब) येथे अप्पर तहसील कार्यालयाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महसूल राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री संजय राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रा. अशोक उईके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, जि.प.सदस्य विजय राठोड, सरपंच राधेश्याम जयस्वाल, पं.स. सदस्य पुष्पा शेळके, अपर तहसीलदार रंजीत भोसले, मिर्झा रफी अहमद बेग आदी उपस्थित होते.
या इमारतीच्या बांधकामासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सातत्याने पाठपुरावा केला, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, मेटीखेडा येथील अप्पर तहसील कार्यालय नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. गतीने इमारत उभी होण्यासाठी अनेकांचे योगदान आहे. यानंतरही गावाच्या विकासासाठी जे शक्य आहे, ते उपलब्ध करून दिले जाईल. मेटीखेडा येथे पोलिस स्टेशनच्या मागणीबाबत पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील इंग्रजकालीन सर्व पोलिस स्टेशनाच्या पुन:उर्भारणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल. केंद्र आणि राज्य शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. सातबारा, फेरफार, शेततळे, धडक सिंचन, रेल्वे भुसंपादन, राष्ट्रीय महामार्ग आदी योजना नागरिकांपर्यंत पोहचत आहे. शासन प्रशासन समन्वयाने काम करीत आहे. विशेष करून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नेतृत्वात प्रशासन उत्तम काम करीत आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना महसूल राज्यमंत्री संजय राठोड म्हणाले, ज्या गावात शिक्षण झाले त्याच गावात संबंधित विभागाचा मंत्री म्हणून अप्पर तहसील कार्यालयाचे उद्घाटन करतांना अतिशय आनंद होत आहे. हे कार्यालय जनतेच्या सेवेत रुजू होत आहे. सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारे हे कार्यालय राहील. अनेक विकासात्मक योजनांमध्ये जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. सरकारच्या अनेक योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मेटीखेडा, पहूर येथे कायदा व सुव्यवस्थेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरीता मेटीखेडा येथे पोलिस स्टेशन मंजूर करावे, अशी मागणी गावक-यांच्या वतीने पालकमंत्र्यांकडे केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, मेटीखेडा येथे झालेल्या नवीन कार्यालयातून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होणार. शासकीय कार्यालय केवळ सिमेंट, रेती, दगडाने बनत नाही तर ते नागरिकांच्या घामातून निर्माण होते. हे कार्यालय नागरिकांच्या आकांक्षेचे प्रतिक आहे. अधिकारी आणि कर्मचा-यांनी चांगले काम करून विकास कामांना गती द्यावी, अशा सुचना त्यांनी केल्या. यावेळी आमदार प्रा. अशोक उईके यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.
21 जून 2018 च्या शासन निर्णयानुसार मेटीखेडा येथे अपर तहसील कार्यालयाची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. या कार्यालयाच्या अंतर्गत 42 गावे समाविष्ट असून जोडमोहा आणि मेटीखेडा हे दोन मंडळ आणि 13 साजे राहणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी तर संचालन श्रीमती माळवे यांनी केले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी