सोशल मिडीयावर जबाबदारीने वागणे गरजेचे - अपर पोलिस अधिक्षक जाधव


v फेकन्यूज परिणाम व दक्षताबाबत पत्रकारांची कार्यशाळा
यवतमाळ, दि. 1 : लोकशाहीमध्ये प्रसार माध्यमांचे अनन्यसाधारण महत्व आहे. समाजाला दिशा देणारा घटक म्हणून याकडे बघितले जाते. मात्र आज सोशल मिडीयाचा वापर वाढला आहे. यात कोणतीही शहानिशा न करता मोठ्या प्रमाणात माहिती फॉरवर्ड केली जाते. ही माहिती कट-पेस्ट करून अपलोड होत असल्याने त्याचे दुष्परिणाम बघायला मिळत आहे. शिवाय यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण होत आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अपर पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा माहिती कार्यालय, पोलिस अधिक्षक कार्यालय आणि श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने फेकन्यूज परिणाम आणि दक्षता या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी सायबर सेलचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जिद्दमवार, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.
पुढे बोलतांना अपर पोलिस अधिक्षक जाधव म्हणाले, गत काही दिवसांत देशात आणि राज्यात दुर्देवी घटना घडल्या आहेत. समाजातील काही बेजबाबदार घटक जाणिवपूर्वक अशा पोस्ट सोशल मिडीयावर अपलोड करतात. त्यामुळे समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होते. समाजापर्यंत चांगल्या गोष्टी पोहचविणे आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. कुणाचेही बळी जाणार नाही, तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. समाजामध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी सोशल मिडीयावरील ब-याच पोस्ट पाहिजे त्या पध्दतीने तयार केले जातात. तसेच आलेली पोस्ट कट-पेस्ट आणि स्वत:च्या पध्दतीने एडीट करून पसरविण्यात येते. यापासून सावध राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना सायबल सेलचे श्रीकांत जिद्दमवार म्हणाले, सोशल मिडीया हे ज्ञानाचे भंडार असले तरी हे एक आभासी जग आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी त्वरीत सोडविणे, गरजुंना त्वरीत मदत उपलब्ध करून देणे अशी अनेक उदाहरणे आहेत. मात्र काही लोकांकडून गैरसमजसुध्दा पसरविले जात आहे. समाजात द्वेष पसरणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे पोलिस ई-मित्र ही संकल्पना राबविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी केले. यावेळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
                                               00000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी