प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये जिव्हाळा निर्माण करा - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख



v महसूल दिन कार्यक्रमात उत्कृष्ट अधिकारी-कर्मचा-यांचा गौरव
v विदर्भ चेंबर ऑफ इंडस्ट्रीजकडून विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप
यवतमाळ, दि. 1 : महसूल विभाग हा प्रशासनात महत्वाचा अंग मानला जातो. असे असले तरी इतर विभागाचासुध्दा प्रशासनात महत्वाचा सहभाग आहे. सर्व विभागाच्या समन्वयातूनच चांगले काम होऊ शकते. कोणत्याही विभागाची प्रतिमा ही त्या विभागात काम करणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांवर अवलंबून असते. आपल्याकडे कामानिमित्त येणा-या नागरिकांशी आपण सौहार्दाने वागलो तर त्याला मिळणारा आनंद त्याच्या मनात चिरकाल टिकतो. त्यामुळे प्रशासनाबद्दल नागरिकांच्या मनात जिव्हाळा निर्माण होईल, या पध्दतीने काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी व कर्मचा-यांचा गुणगौरव व विदर्भ चेंबर ऑफ इंडस्ट्रिजतर्फे मोफत पुस्तके वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी अनुप खांदे, संदीप महाजन, विदर्भ चेंबर ऑफ इंडस्ट्रीजचे प्रमुख महेंद्र दर्डा आदी उपस्थित होते.
महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असला तरी केवळ कणा ताठ राहून चालत नाही, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ज्याप्रमाणे शरीराचे इतर अवयव चांगले असणे महत्वाचे आहे, त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या विकासासाठी इतर विभागही महत्वाचे आहे. प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचा-यांनी अधिक लोकाभिमुख होणे गरजेचे आहे. तसेच कामात पारदर्शता असली पाहिजे. नागरिकांची कामे करण्यासाठी संवदेनशील असलो तर आपले काम सोपे होते. जे नागरिक आपल्याकडे काम घेऊन येतात, त्यांना चांगली वागणूक द्या. आपल्या वागणुकीतून आणि कामातून माणुसकीचे दर्शन घडायला पाहिजे, असे ते म्हणाले.
महसूल विभागासह इतर विभागाच्या कामकाजावर शासनाची प्रतिमा अवलंबून असते. शासनाच्या अनेक फ्लॅगशीप योजनांमध्ये यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. हे केवळ समन्वयातून शक्य झाले. यापुढेसुध्दा लोककल्याणासाठी टीम यवतमाळ म्हणून आपण नक्कीच यशस्वी ठरू, असा विश्वास जिल्हाधिका-यांनी व्यक्त केला. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे, आणि तो मी मिळविणारच असा नारा लोकमान्य टिळकांनी दिला होता. त्यांची आज पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. आपल्याला स्वराज्य तर मिळाले मात्र नागरिकांना सुराज्य देण्याची जबाबदारी आपली आहे, त्यासाठी सर्वांनी समन्वयातून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी चंद्रकात जाजू, तहसीलदार सचिन शेजाळ, महेंद्र दर्डा यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
विदर्भ चेंबर ऑफ इंडस्ट्रीजच्या वतीने अंकिता प्रधान, प्रिया करताडे आदी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देण्यात आली. तर प्रशासनाच्या वतीने पाणी फाऊंडेशमध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या रामाजी टेकाम, तलाठी संतोष चव्हाण, कृषी सहायक शंकर गिरगावकर, ग्रामविकास दूत आश्विनी बांबल, पोलिस पाटील विकास बोरकर यांचा, जलयुक्त शिवारमध्ये कार्य करणारे कृषी अधिकारी ए.आर. पिंपरखेडे, मागेल त्याला शेततळेमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे कृषी सहायक सुभाष राठोड, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत विकासगंगा सामाजिक संस्था तसेच महसूल विभागांतर्गत डिजीटायझेशनमध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या सोनल झोड, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, कोतवाल एस.एस. मुंजाळ, पोलिस पाटील पी.बी. कांबळे यांच्यासह कनिष्ठ लिपीक, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आदींचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी केले. संचालन व आभार नंदकुमार बुटे यांनी मानले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, संदीप अपार, नितीन हिंगोले, माहिती व सुचना केंद्राचे राजेश देवते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी