दिग्रस येथे पालकमंत्र्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी





v त्वरीत निधी वाटप करण्याच्या सुचना
यवतमाळ, दि. 18 : जिल्ह्यात गत दोन-तीन दिवसांपासून पावसाची संततधार असल्याने काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमिवर जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी दिग्रस येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांना त्वरीत निधी वाटप करण्याच्या सुचना दिल्या.
जिल्ह्यात 15 ऑगस्ट पासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे एकूण सहा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी नागरिकांना स्थलांतरीतसुध्दा करावे लागले. या पूरग्रस्तांच्या समस्या आणि प्रशासनाच्या उपाययोजना जाणून घेण्यासाठी पालकमंत्री मदन येरावार यांनी दिग्रस येथील वाल्मिकी नगर, घंटीबाबा मंदीर परिसर, मुख्य बाजारपेढ, धावंडा नदीलगतच्या निवासी वस्त्या आदी भागांना भेटी दिल्या. या भागात प्रशासनाने तात्काळ सर्व्हे करून पूरग्रस्त नागरिकांना निधी वाटप करावा. यात कोणतीही दिरंगाई नको, अशा सुचना त्यांनी केल्या.
भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून धावंडा नदीचे रुंदीकरण, सरळीकरण आणि संरक्षण भिंत बांधण्यासाठी संबंधित यंत्रणेने प्रस्ताव पाठवावा. निधीअभावी कोणतेही काम अडणार नाही. 2005 नंतर दिग्रस येथे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यात नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी धावंडा नदी परिसरातील किती कुटुंबांना स्थलांतरीत केले, याची माहिती जाणून घेतली. तसेच नागरिकांच्या समस्यासुध्दा जाणून घेतल्या. वाल्मिकी नगर येथील माला मुजमुले या अपंग स्त्रिला रोजगारासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय परिसरात जागा देण्याबाबतसुध्दा त्यांनी संबंधितांना सुचना केल्या. यावेळी विश्रामगृहात नांदगव्हाण येथील नागरिकांनी पुनर्वसनाबाबत पालकमंत्र्यांना निवेदन दिले. विशेष म्हणजे शिल्पा खंडारे व श्रेया खंडारे यांनी संपूर्ण पावसात नदीकाठच्या पूरग्रस्त लोकांसाठी जेवणाची व्यवस्था व त्यांना कपडे वाटप केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी दोघींचेही कौतुक केले.
यावेळी माजी मंत्री संजय देशमुख, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार किशोर बागडे, न.प.मुख्याधिकारी शेषराव टाले व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी