मिळालेल्या योजनेचा उपयोग गावच्या विकासासाठी करा - पालकमंत्री मदन येरावार



v समाजकल्याण विभागाच्या वतीने लाभार्थी सन्मान सोहळा
यवतमाळ, दि. 27 : केंद्र व राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ पारदर्शकपणे लाभार्थ्यांना मिळत आहे. शासनाच्या योजना केवळ कागदावर राहिल्या नसून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आदी क्षेत्रात सर्वसामान्यांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. मात्र ज्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळत आहे, त्यांनी त्या केवळ स्वत:पुरत्या मर्यादीत ठेवू नये. इतरांना त्याची माहिती देऊन गावच्या विकासासाठी या योजनांचा उपयोग करावा, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
समाजकल्याण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या बचत भवन येथे आयोजित लाभार्थी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जि.प. समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, सदस्या रेणू शिंदे, न.प. स्थायी समिती सदस्य रेखा कोठेकर, आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, पं.स. सदस्या सुनिता मडावी, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त किशोर भोयर, जि.प. समाजकल्याण अधिकारी विशाल जाधव आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभाग व जि.प. समाजकल्याण विभाग अतिशय चांगले काम करीत आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, आगामी काळात शासनाच्या सर्व योजना ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ऑप्टीक फायबरने ग्रामपंचायती जोडण्यात येत आहे. नागरिकांपर्यंत सुलभतेने आणि पारदर्शकपणे सेवा पोहचविण्यासाठी थेट हस्तांतरण योजना (डीबीटी) आणली. या माध्यमातून योजनेसाठी असलेली तरतूद थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे. शासनाचा पैसा हा देशातील 125 कोटी जनतेचा हक्काचा पैसा आहे. जनतेला न्याय देण्यासाठी हा पैसा खर्च करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत जवळपास 400 आजारांचा समावेश करण्यात आला आहे. नामांकित रुग्णालयाचा यात समावेश असल्याने रुग्णालय निवडण्याचा अधिकार आता रुग्णाला आहे. व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसी या प्रवर्गासाठी वेगळ्या विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. शासनाने 100 टक्के अनुदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबळीकरण योजनेंतर्गत अनेक भुमिहिन शेतक-यांना उदरनिर्वाहासाठी शेतजमीन उपलब्ध करून दिली जात आहे. डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक तत्वावर केंद्र आणि राज्य सरकारची वाटचाल सुरू आहे. सर्व योजना सामान्य नागरिकांसाठी असून निधीअभावी एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी स्वाधार योजनेंतर्गत प्रतिक्षा कांबळे, हर्षल मेश्राम, प्रियंका सुर्यवंशी, वृषाली भवरे, मिनी ट्रॅक्टर वाटप अंतर्गत प्रशिक स्वयंसहायता पुरुष बचत गट, पंचशील पुरुष बचत गट, ज्योतिबा पुरुष बचत गट, रमाई महिला बचत गट, गटई स्टॉल वाटप अंतर्गत सुनिता बरवे, भारती काणे, दीपक पारेकर, भाग्यश्री लोखंडे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबळीकरण योजनेंतर्गत कैलास पाईकराव, वर्षा नगराळे, शुध्दोदन डोंगरे, जि.प. सेस फंडातून देण्यात येणा-या लाभांमध्ये प्रियंका फरताडे, आश्विनी कराळे, अंधमहिला सारिका इंगळे, तुषार सिंचन अंतर्गत जिजाबाई रिंगणे, देविदास पारधी आदी लाभार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी केले. संचालन कैलास राऊत यांनी तर आभार समाजकल्याण अधिकारी विशाल जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला नगरसेविका माया शेरे, लता ढोंबरे, करुणा तेलंग, अमर दिनकर, नितीन गिरी, विजय खडसे यांच्यासह नागरिक, लाभार्थी व विद्यार्थी उपस्थित होते.
००००००००






Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी