जिल्हाधिका-यांनी केली शेतात प्रत्यक्ष फवारणी




                             
      
v शेतक-यांना सुरक्षा कीट आणि कामगंध सापळे वाटप
v वैद्यकीय महाविद्यालयात फवारणीबाधित रुग्णांची विचारपूस
यवतमाळ, दि. 2 : शेतमालावर फवारणी करतांना सुरक्षेची काळजी घेतली तर आपण स्वत:चा जीव वाचवू शकतो, हा संदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रत्यक्ष शेतात फवारणी केली. यवतमाळ तालुक्यातील भिसनी येथील सुरेश पाडसेकर यांच्या शेतात सुरक्षा किटचे महत्व, कामगंध सापळे, बोंडअळीवर उपाययोजना आदींबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिका-यांनी आज येथे भेट दिली.
शेतक-यांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, जिल्ह्यात एकूण लागवडीच्या जवळपास 50 टक्के जमिनीवर कपाशीची लागवड करण्यात येते. गत काही वर्षांपासून कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे फवारणी करतांना जिल्ह्यात दुर्देवी घटना घडल्या. याची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये, यासाठी कृषी, महसूल आणि आरोग्य विभागाच्यावतीने किटकनाशक फवारणीसंदर्भात विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात 2 ते 4 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येईल. या दरम्यान महसूल आणि कृषी विभागाचे तसेच बियाणे व किटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन शेतक-यांना मार्गदर्शन करतील. आरोग्य विभागाच्या माध्यमातून शेतकरी आणि शेतमजुरांची तपासणी करण्यात येईल. बियाणे आणि किटकनाशक कंपन्यांना जनजागृतीकरीता तालुके ठरवून देण्यात आले आहेत. सर्व यंत्रणेच्या समन्वयातून शेतकरी आणि शेतमजुरांना फवारणीबाबत मार्गदर्शन झाले तर भविष्यातील दुर्देवी घटना आपण टाळू शकतो, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतात लावण्यात आलेले कामगंध सापळे, पीक परिस्थितीची पाहणी करून शेतक-यांना तांत्रिकदृष्ट्या सर्व माहिती देण्याचे निर्देश दिले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. मगर शेतक-यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले, शेतक-यांनी कीड व्यवस्थापन प्रणालीचा वापर करावा. फवारणी करतांना आपले शरीर किटकनाशकाच्या संपर्कात येऊ देऊ नये. त्यासाठी अंगरक्षक सुरक्षा कीट, हातमोजे, चष्मा किंवा गॉगल, नाकावर मास्क, डोक्यावर टोपी किंवा दुपट्टा, पायात बुट आदी परिधान करावे. तसेच तंबाखू मळून किंवा इतर पदार्थांचे सेवन करून फवारणी केल्यास जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हातपाय किंवा शरीरावर जखम असेल तर अशा व्यक्तिंनी फवारणी करू नये. फवारणीकरीता द्रावण तयार करतांना काडीच्या सहाय्याने द्रावणाला ढवळावे. हवेच्या विरुध्द दिशेने फवारणी करू नये.  झाडापासून फवारणी यंत्र एक फूट उंचावर ठेवावे. फवारणीकरीता साधे पंप वापरावे. पेट्रोल पंप किंवा पावर पंपाचा वापर टाळावा.
वेगवेगळ्या मिश्रणाने झाडाची उत्पादन क्षमता कमी होते. शिफारस केलेल्या मात्रेनुसारच मिश्रण तयार करावे. विशेष म्हणजे फवारणीसाठी निंबोळी अर्कचा वापर करावा. निंबोळी अर्क किडींना चार मार्गाने रोखू शकते आणि किटकनाशकाच्या दोन-तीन फवारण्या आपण नक्कीच कमी करू शकतो. प्रती एकराला 10 कामगंध सापळे लावावे. निदर्शनास आलेल्या डोमकळ्यांचे 10 फुले तोडली तर एक लाख बोंडअळी आपण नष्ट करू शकतो, असे डॉ. मगर यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिका-यांच्या हस्ते 50 सुरक्षा किट आणि कामगंध सापळ्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला तहसीलदार सचिन शेजाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सुरेश नेमाडे यांच्यासह तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक आणि गावातील शेतकरी उपस्थित होते.
वैद्यकीय महाविद्यालयात फवारणीबाधित रुग्णांची विचारपूस : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती असलेले देवरात जाधव, संदीप पवार, विठ्ठल राठोड, संतोष पवार, किशोर राठोड या फवारणीबाधित रुग्णांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी विचारपूस केली. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले उपस्थित होते. 
000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी