यवतमाळ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालयास तत्वत: मंजुरी


v पालकमंत्री मदन येरावार यांच्या पाठपुराव्याला यश
यवतमाळ, दि. 1 : यवतमाळ येथील नवीन शासकीय कृषी महाविद्यालयाचा रखडलेला प्रश्न जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या पाठपुराव्यामुळे निकाली निघाला आहे. येथील नवीन शासकीय कृषी महाविद्यालयाला शासनाने मंजूरी दिल्यामुळे यवतमाळकरांचे कृषी महाविद्यालयाचे स्वप्न साकार होणार आहे.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणा-या यवतमाळ येथील शासकीय कृषी महाविद्यालयाला मंत्री मंडळाने तत्वत: मंजुरी दिली आहे. पश्चिम विदर्भात व अमरावती विभागात अकोलानंतर हे दुसरेच शासकीय कृषी महाविद्यालय आहे. या कृषी महाविद्यालयाचा फायदा यवतमाळ जिल्ह्यासोबतच बाजुच्या वाशिम, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांनासुध्दा होणार आहे.
सदर कृषी महाविद्यालय हे यवतमाळ शहरालगत 30 हेक्टर जागेत उभारण्यात येईल. यासाठी 63 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने महाविद्यालयासाठी मुख्य प्रशासकीय इमारत, विद्यार्थ्यांसाठी वर्ग, प्रयोगशाळा, संशोधन कक्ष, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह, विश्रामगृह आदी इमारती उभारल्या जाणार आहेत. तसेच महाविद्यालयासाठी लागणारी विविध यंत्रसामग्री खरेदी करण्याससुध्दा शासनाने मान्यता दिली आहे.
सुरवातीला या महाविद्यालयात 60 विद्यार्थी संख्या राहणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील शेतक-यांच्या मुलांना तंत्रशुध्द शेतीविषयक ज्ञान मिळण्यासाठी एक नवीन दालन उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे हे महाविद्यालय शेतक-यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यासाठी सहाय्यभुत ठरणार आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी