बँकींग सेवा देतांना व्यवहारातील नम्रता आवश्यक - पालकमंत्री मदन येरावार




v जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सीबीएस प्रणाली व डाटा सेंटरचे उद्घाटन
यवतमाळ, दि. 16 : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ख-या अर्थाने शेतक-यांची बँक आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी बँकांनी आधुनिक सेवा देणे गरजेचे आहे. मात्र ही सेवा देत असतांना ग्राहक व       शेतक-यांप्रती बँकेच्या अधिकारी व कर्मचा-यांमध्ये व्यवहारातील नम्रता आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सीबीएस व डाटा सेंटरचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय राठोड होते. यावेळी मंचावर बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, उपाध्यक्ष च.रा. गाडे पाटील, अनिरुध्द लोणकर, माजी अध्यक्ष विनायक येकरे, वसंत घुईखेडकर, सीबीएस प्रणालीचे सल्लागार कल्याण पाटील, व्हर्च्युअल गॅलेक्सीचे सचिन पांडे, अविनाश शेंडे आदी उपस्थित होते.
50 वर्षाच्या प्रवासात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सीबीएस व डाटा सेंटरपर्यंत पल्ला गाठला आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, नम्रता ही सिस्टीमने नाही तर मानवी स्वभावाने द्यावी लागते. या बँकेत सुरू करण्यात आलेला डाटा सेंटर आणि सीबीएस प्रणाली बँकचे संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे. निरंतर आणि शाश्वत सेवा देणे हे बँकेचे धोरण आहे. समाजासाठी काम करतांना मुल्ये, बांधिलकी, विवेक ठेवणे गरजेचे आहे. या गोष्टी आत्मसाद करणे काळाची गरज आहे. या बँकेचे अधिकारी – कर्मचारी या गोष्टी करीत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्जमाफी आणि पीककर्ज वाटपात अग्रेसर आहे, याचा अभिमान आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची सर्वजण काळजी घेऊ, असे पालकमंत्री म्हणाले.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना महसूल राज्यमंत्री संजय राठोड म्हणाले, या बँकेचा मीसुध्दा खातेदार आहे. बँकेत सीबीएस प्रणाली आणि डाटा सेंटरचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनी झाले, याचा अतिशय आनंद आहे. शेतक-यांची बँक म्हणून सर्वांचा जिव्हाळा या बँकेवर आहे. बँकेला आणखी प्रगती पथावर नेण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सीबीएस प्रणालीचे सल्लागार कल्याण पाटील, व्हर्च्युअल गॅलेक्सीचे सचिन पांडे, अविनाश शेंडे यांचा मंत्र्यांच्या हस्ते तर बँकेच्या वतीने पालकमंत्री मदन येरावार आणि सहपालकमंत्री संजय राठोड यांचासुध्दा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे यांनी तर संचालन व्यवस्थापक अरविंद देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाला संचालक श्री. बोदकुरवार, श्री. पाचभाई, प्रकाश मानकर, श्री. वानखेडे, जैत पाटील, रविंद्र देशमुख यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी