जिल्हाधिका-यांनी घेतली बियाणे, किटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक



v फिल्डवर जाऊन शेतक-यांना मार्गदर्शन करण्याच्या सुचना
यवतमाळ, दि. 1 : शेतक-यांसाठी खरीप हंगाम अतिशय महत्वाचा आहे. जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन लागवडीचे क्षेत्र मोठे आहे. गत वर्षी बोंड अळीचे संकट आणि किटकनाशक फवारणीमुळे जिल्ह्यात दुर्देवी घटना घडल्या. यावर वेळीच उपाय करण्यासाठी व शेतक-यांना नियोजनपध्दतीने मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बियाणे तसेच किटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विस्तार अधिकारी कैलास वानखेडे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, गतवर्षी जिल्ह्यात फवारणीबाधित रुग्णांची संख्या आढळून आली. यात काही दुर्देवी घटना घडल्या. यावर्षीसुध्दा फवारणीबाधित रुग्ण आढळून येत आहे. कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी शेतक-यांना किटकनाशक फवारणीबाबत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभागासह इतर विभाग व कृषी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन शेतक-यांना मार्गदर्शन करावे. विशेष म्हणजे फिल्डवर काम होतांना दिसणे गरजेचे आहे. अन्यथा संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येईल. गावात फवारणी करणा-यांची संख्या कमी असते. तेच ते व्यक्ती सातत्याने फवारणीची कामे करीत असतात. अशा व्यक्तिंच्या याद्या कृषी विभागाने तयार कराव्यात. फवारणी करणा-यांना सुरक्षेचे नियम समजावून सांगा. अजूनही काही जण सुरक्षा किट घालून फवारणी करीत नाही अशा व्यक्तिंना त्यापासून होणारे दुष्परिणाम समजावून सांगणे गरजेचे आहे.
फवारणीकरीता सुरक्षा कीट व फेरोमन ट्रपबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी बियाणे कंपन्यांना जे तालुके वाटून दिले आहे, तेथे गांभिर्याने काम करा. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केलेल्या कामाची पडताळणी करण्यात येईल. तसेच फिल्डवर जातांना कृषी विभाग आणि इतर विभागाच्या अधिकारी- कर्मचा-यांनी आपल्या गाड्यांमध्ये सुरक्षा किट नेहमी ठेवणे गरजेचे आहे. कंपन्यांच्या प्रतिनिधींचे दूरध्वनी क्रमांक कृषी विभागाने संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना उपलब्ध करून द्यावे. राशी सिड्सने जिल्ह्यातील सर्व जिनिंगमध्ये लवकरात लवकर फेरोमन ट्रप लावून सात दिवसांत अहवाल सादर करावा, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल्या. यावेळी त्यांनी प्रत्येक कंपनीच्या प्रतिनिधींकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच भविष्याचे नियोजनाबाबत माहिती जाणून घेतली.
आतापर्यंत जिल्ह्यातील 16 तालुक्यात कृषी स्तरावरून 5 हजार 950 किटचे वाटप करण्यात आले आहे. तर कंपन्यांमार्फत 12 हजार 400 किटचा थेट पुरवठा करण्यात आला असून जिल्हा परिषद सेस फंडातून 12 हजार 367 चे नियोजन करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी बियाणे व किटकनाशक कंपन्यांचे जवळपास 50 प्रतिनिधी उपस्थित होते.
                                                    0000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी