महसूल राज्यमंत्र्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी




पूरग्रस्त भागात 24 तास आरोग्य सेवा देण्याच्या सुचना
यवतमाळ, दि. 20 : गत आठवड्यापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे काही तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभुमिवर महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय राठोड यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली.
सततच्या पावसामुळे दिग्रस तालुक्यातील संपूर्ण दिग्रस शहर, बेलोरा, धानोरा (खुर्द) आदी ठिकाणी नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सहपालकमंत्री संजय राठोड यांनी या भागाचा दौरा करून संबंधित यंत्रणेला उपाययोजनेबाबत सुचना केल्या आहेत. अधिका-यांच्या आढावा बैठकीत दिग्रस, दारव्हा, नेर व पुसद येथील नगर पालिकेच्या अग्निशमन गाड्या त्वरीत बोलावून संपूर्ण शहरात साठलेला चिखल धुवून काढण्याचे आदेश दिले. पूर परिस्थिती ओसरली असली तरी या भागात रोगराई पसरू नये म्हणून 24 तास आरोग्य सेवा देण्याच्या सुचना त्यांनी केल्या.
येथील पूरग्रस्त लोकांकरीता बालाजी मंदीर, शास्त्री नगर, न.प.मराठी शाळा क्रमांक 3, देवनगर, जिजाऊ सांस्कृतिक भवन, बापू नगर येथे भोजनाची अविरत व्यवस्था सुरू करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पूरग्रस्तांना शासनाकडून धान्य देण्याच्या संदर्भात पुरवठा विभागाच्या सचिवांशी याबाबत त्यांनी चर्चा केली. तसेच पुरात वाहून मृत झालेल्या बाजीराव डेरे यांच्या कुटुंबियांची सहपालकमंत्री संजय राठोड यांनी भेट घेऊन मदतीचा धनादेश कुटुंबियांकडे सुपुर्द केला.
यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार किशोर बागडे, मुख्याधिकारी शेषराव टाले आदी उपस्थित होते.
                                              ०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी