गोवर-रुबेला लसीकरण मोहीम कार्यशाळा



v युनिसेफ आणि जिल्हा आरोग्य विभागाचा उपक्रम
यवतमाळ, दि. 28 :  गोवर या रोगाचे निर्मुलन होण्याकरीता तसेच रुबेला या रोगावर नियंत्रण मिळविण्याकरीता संपूर्ण राज्यात नोव्हेंबरमध्ये गोवर - रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने युनिसेफ आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गोवर-रुबेला लसीकरणाबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, युनिसेफचे समन्वयक डॉ. तुषार भोयर, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. दिलीप देशमुख, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, डॉ. सुभाष ढोले उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ. दिलीप देशमुख म्हणाले, गोवर झाला की शरीरातील प्रतिकारशक्ती झपाट्याने कमी होते. त्यामुळे मुलांच्या शरीरात व्हिटॅमीन - ए ची कमतरता जाणवते नव्हे ती बहुतांशी संपतेच. परिणामी अशी बालके आंधळी होण्याचा धोका संभवतो. शिवाय प्रतिकारशक्ती कमी झाली की डायरीया, न्युमोनिया, कुपोषण आदी आजार होण्याशी शक्यता असते. भारतात गोवरमुळे दरवर्षी 50 हजार रुग्णांचा मृत्यु होतो. त्यामुळे संपूर्ण बालकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. रुबेला असलेल्या गर्भवती स्त्रीचे बाळ अनेक व्याधींनी ग्रस्त असते. 9 महिने ते 15 वर्षे या वयोगटात रुबेलाच्या केसेस आढळून येतात. त्यावरील वयोगटात त्याचे प्रमाण कमी होत असते. त्यामुळे रुबेला लसीकरणाच्या एका इंजेक्शनमुळे एक भावी पिढी आपण वाचवू शकतो, असे डॉ. दिलीप देशमुख यांनी सांगितले.
गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम हा केवळ एका विभागाचा कार्यक्रम नाही तर यात आरोग्य विभागासोबतच एकात्मिक बालविकास प्रकल्प, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग आदींचा समन्वय असणे गरजेचे आहे. आगामी काळात गोवर व रुबेलाची लस एकत्रित वापरण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे हे ध्येय सर्वांनी ठेवावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी केले. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव म्हणाले, आपले बाळ डोळ्यासमोर आठवून या रोगांबाबत काळजीपूर्वक लसीकरण करावे. एकही लाभार्थी बालक यापासून वंचित राहता कामा नये, त्यासाठी सुक्ष्म नियोजन करा, असे ते म्हणाले.
गोवर - रुबेला लसीकरण मोहिमेकरीता 100 टक्के लाभार्थी नोंदणी, सर्व स्तरातील अधिकारी – कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याकरीता नियोजन करण्यात येत आहे. भारतातील 21 राज्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान 9 महिने पूर्ण व 15 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील सर्व बालकांना    गोवर – रुबेला लसीचा पहिला डोज देण्यात येईल. ही मोहीम सुमारे पाच आठवडे चालेल. सुरवातीचे दोन आठवडे प्रत्येक शाळेतील लाभार्थ्यांना डोज देण्यात येईल. त्यानंतर शाळेत न जाणा-या लाभार्थ्यांकरीता दोन आठवडे मोहीम व पाचव्या आठवड्यात उर्वरीत सर्व लाभार्थ्यांना डोज देण्यात येणार आहे. या लसीचा कोणताही दुष्परिणाम नसून ही लस घेतल्यानंतर लाभार्थीचा गोवर व रुबेला या दोन्ही रोगांपासून बचाव होईल, अशी माहिती कार्यशाळेत देण्यात आली.
यावेळी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, सुपरवायझर, विस्तार अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी