राष्ट्रसंतांनी दाखविलेल्या मार्गानुसार कर्तव्य पार पाडा – जिल्हाधिकारी


v जिल्हाधिकारी कार्यालयात तुकडोजी महाराज जयंती
      यवतमाळ, दि. 30 : संत तुकडोजी महाराज यांचा जन्म विदर्भात झाला असला तरी देशाचे राष्ट्रसंत होते. त्यांनी संपूर्ण देशाला ग्रामीण प्रशासनाचे धडे दिले. स्वच्छता, शिक्षण आदी विषयांबाबत त्यांच्या संदेशाचे महत्व आजही कायम आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रसंतांनी दाखविलेल्या मार्गानुसार कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी.  भराडी, तहसीलदार शैलेश काळे आदी उपस्थित होते.
            राष्ट्रसंतांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावल येथे झाला, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, समाजात एक आदर्श व्यवस्था कशी निर्माण करावी, याबाबत त्यांनी ग्रामगीतेत सांगितले आहे. त्यांच्या ग्रामगीतेत सर्व विषयांची मांडणी असून प्रशासकीय कामकाजात त्याचे प्रतिबिंब जाणवते, असेही त्यांनी सांगितले.
            निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे म्हणाले, राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेत गावविकासापासून ते देशाच्या संरक्षणापर्यंत सर्व गोष्टीचे ज्ञान आहे. सीमेवरील सैनिकांसाठी व नागरिकांसाठी देशभक्ती जागविणारे अभंग त्यांनी लिहिले. मानवी जीवनावर मोठा प्रकाश त्यांनी त्यांच्या कार्यातून टाकला आहे. धर्म आणि अध्यात्म तसेच समता आणि एकात्मतेचा संदेशही त्यांनी दिला. राष्ट्रसंतांच्या विचारांना समोर घेऊन जाणे आजच्या काळाची गरज आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणाले.
            तत्पूर्वी जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी व इतर मान्यवरांनी राष्ट्रसंतांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी