निवडणूक तयारीबाबत विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा



v जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिका-यांची बैठक
यवतमाळ, दि. 8 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 संदर्भात विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिका-यांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते.
11 एप्रिल रोजी यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे, असे सांगून विभागीय आयुक्त पियुष सिंह म्हणाले, या निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा उपयोग होत आहे. याबाबत काही तक्रार आली तर ती त्वरीत सोडवा. मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी असलेल्या व्हीलचेअरचा उपयोग वयोवृध्द मतदारांनासुध्दा करता येणार आहे. तसेच मतदार ओळखपत्र नसलेल्या नागरिकांना मतदान करण्यासाठी पर्यायी 11 प्रकारच्या ओळखपत्रापैकी एक ओळखपत्र दाखविणे आवश्यक आहे. ओळखपत्राची ही यादी मतदान केंद्रांवर ठळक अक्षरात लावावी, अशा सुचना त्यांनी दिल्या.   
वाहन तपासणी दरम्यान आतापर्यंत किती रक्कम जप्त करण्यात आली असे विचारले असता, विविध पथकांद्वारे जवळपास 34 लक्ष रुपये जप्त करण्यात आले असून पुरावे सादर केल्यावर 12 लक्ष रुपये संबंधित मालकाला परत करण्यात आले आहे. उर्वरीत रक्कम कोषागार कार्यालयात जमा असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच जिल्ह्यात 252 मतदान केंद्रांवर वेब कास्टींग करण्यात येणार आहे. तर 11 मतदान केंद्रांचे व्यवस्थापन संपूर्ण महिला करणार आहेत. आतापर्यंत सी-व्हिजील ॲपवर सात तक्रारी प्राप्त झाल्या असून यापैकी सहा तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात 252 मतदान केंद्रांवर वेब कास्टींग होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्तांनी व्हीलचेअर, रॅम्प, शासकीय व खाजगी गाड्या, पोस्टल बॅलेट, मतदानाकरीता लागणारी साधनसामुग्री, 1950 हेल्पलाईन क्रमांक, व्होटर स्लीप, मायक्रो आब्जर्व्हरांचे प्रशिक्षण, विद्युत व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था, मनुष्यबळ आदींचा आढावा घेतला.
तत्पूर्वी विभागीय आयुक्तांनी लोहारा येथील जि.प. प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र 49, 50, 51, वाघापूर येथील उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र 35, 36, 37, 38 आणि पिंपळगाव येथील वेदधारणी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र 15 आणि 17 या मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली.  
००००००





Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी