मतदानाकरीता जिल्हा प्रशासन सज्ज




v निवडणूक साहित्य घेऊन कर्मचारी रवाना
यवतमाळ, दि. 10 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघात 11 एप्रिल 2019 रोजी मतदान होत आहे. या मतदानाकरीता जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून निवडणूक साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत.
14-  यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघातील 34 – वाशिम, 35 – कारंजा, 77- राळेगाव, 78- यवतमाळ, 79- दिग्रस व 81- पुसद या विधानसभा मतदार संघात 2206 मतदान केंद्र आहेत. या केंद्रांवर मतदान साहित्य घेऊन मतदान पथके रवाना करण्यात आली. या साहित्यामध्ये 2 बॅलेट युनिट, 1 कंट्रोल युनिट व 1 व्हीव्हीपॅट मशीनचा समावेश आहे. मतदान पथके मतदान केंद्रावर पोहोचली असून लोकसभा मतदार संघातील 219 मतदान केंद्रावर वेब कास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदार संघात एकूण 88 मतदान केंद्रे क्रिटीकल असून या मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदार संघात 217 बसेस, 41 मिनी बसेस व  427 जिप्समार्फत मतदान पथकांना मतदान केंद्रावर सोडण्यात आले. दिव्यांग मतदान बांधवांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ‘पोल डे मॅनेजमेंट सिस्टीम’ या आज्ञावलीर्मात दर दोन तासांनी मतदानाची टक्केवारी, अभिरूप मतदान झाल्याबाबतचा अहवाल व इतर बाबी नियंत्रित करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान पथकासोबत आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणत्याही प्रकारची परिस्थिती हाताळण्यास प्रशासन सज्ज आहे.  
मतदान संपल्यानंतर मतदान पथके मतदान साहित्यासंबंधीत विधानसभा मतदार संघाच्या मुख्यालयी पोहोचवतील. त्यानंतर मतदान यंत्रे पोलीस सुरक्षेमध्ये 14 – यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघाच्या मुख्यालयी म्हणजे शासकीय धान्य गोदाम दारव्हा रोड, यवतमाळ या ठिकाणी आणण्यात येईल. उपरोक्त मतदान यंत्रे पोलीस बंदोबस्तात मतगणनेपर्यंत सुरक्षा कक्षात ठेवण्यात येईल.
मतदारांना मतदार यादीत नाव शोधण्यासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. यावर ऑनलाईन नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. cvigil या मोबाईल ॲपमार्फत आचारसंहितेचा भंग अथवा इतर निवडणूकीच्या संदर्भात नागरिक / मतदारांना तक्रार करता येईल. जेणेकरून मुक्त व निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडली जाईल. मतदानाची टक्केवारी वाढावी याकरीता जिल्हा प्रशासनाने आवश्यक सर्व उपाययोजना राबविल्या असून मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता सर्व प्रयत्न प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी