खर्च तपासणीस अनुपस्थित असणा-या सात उमेदवारांना नोटीस


v निरीक्षकांकडून दैनंदिन खर्चाच्या नोंदवहिची तपासणी
यवतमाळ, दि. 3 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांकडून होणारा दैनंदिन खर्च निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षाकडे सादर करणे बंधनकारक आहे. या खर्चाची तपासणी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याकडून निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत तीन वेळा करण्यात येते. खर्च नोंदवहिच्या पहिल्या तपासणीदरम्यान अनुपस्थित असणा-या सात उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधी कायदा कलम 77 (1) नुसार उमेदवाराला दैनंदिन खर्चाची नोंदवही अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. गार्डन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पहिल्या तपासणीदरम्यान एकूण 24 उमेदवारांपैकी 17 उमेदवार / प्रतिनिधींनी दैनंदिन खर्च नोंदवही निवडणूक निरीक्षक विक्रम पगारीया यांच्यापुढे  सादर केली. तपासणीस अनुपस्थित असलेले प्रभुध्द रिपब्लिकन पार्टीचे  उत्तम कांबळे, बहुजन मुक्ती पार्टीचे रवि जाधव, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राजेश राऊत, प्रहार जनशक्ती पक्षाचे वैशाली येडे, अपक्ष उमेदवार अनिल राठोड, डॉ. राजीव अग्रवाल आणि रामराव पवार या सात उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. अनुपस्थित उमेदवाराने नोटीस प्राप्त झाल्यापासून 48 तासांच्या आत त्यांची दैनंदिन खर्च नोंदवही सनियंत्रण कक्षापुढे सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा भारतीय दंडसंहिता 171 (1) नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच त्यांना देण्यात आलेली वाहनांची परवानगी रद्द केली जाऊ शकते.
उपस्थित असलेल्या 17 उमेदवारांच्या नोंदवहिंचे निरीक्षण करून निवडणूक निरीक्षकांनी अभिप्राय नोंदविले आहेत. 17 पैकी काही उमेदवारांनी आपला खर्च कमी दाखविला आहे तर काहींनी त्यांनी केलेल्या खर्चाच्यासंदर्भात योग्य बिल सादर करण्यास असमर्थता दर्शविली आहे. या सर्वांनासुध्दा नोटीस देण्याचे आदेश निवडणूक निरीक्षक विक्रम पगारीया यांनी दिले आहे.  निरीक्षणदरम्यान एका उमदेवाराने पेडन्यूजचा खर्च त्यांच्या खर्चाच्या नोंदवहित समाविष्ट न केल्याचे आढळून आले. तसेच एका उमेदवाराने त्याच्या उमेदवारी अर्जात उपलब्ध रोख रक्कम 32 हजार दाखवली होती. परंतु उमेदवाराच्या नोंदवहिनुसार त्यांनी त्यांच्या बँकखात्यात 6.5 लक्ष रुपये जमा केल्याचे निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली असता उमदेवारास समाधानकारक उत्तर न देता आल्यामुळे त्यांनासुध्दा नोटीस बजावण्याच्या सुचना निरीक्षकांनी दिल्या. 
निवडणूक निरीक्षक यांची द्वितीय खर्च नोंदवही तपासणी 5 एप्रिल रोजी व तृतीय तपासणी 9 एप्रिल रोजी गार्डन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी देखील सजग राहून काही तक्रारी असल्यास expenditureobserverytlwsm२०१९@gmail.com किंवा 9530400015 या क्रमांकावर कराव्यात, असे आवाहन निवडणूक निरीक्षक विक्रम पगारीया यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी