बोंडअळी नियंत्रणासाठी सुरवातीपासूनच काळजी घ्या - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने




यवतमाळ, दि. 18 : शेतीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जाणारा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. या हंगामात योग्य नियोजन करण्याच्या सुचना जिल्ह्यातील कृषी यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. बोंडअळी नियंत्रणात जिनिंग प्रेसिंगचीसुध्दा महत्वाची भुमिका आहे. त्यामुळे जिनिंग प्रेसींग व्यवस्थापनानेसुध्दा याबाबत सुरवातीपासूनच काळजी घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार, उपसंचालक रवींद्र पाटील, जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात जवळपास चार लक्ष हेक्टरवर कपाशीची लागवड होणार आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, बोंडअळी नियंत्रणासाठी सुरवातीपासूनच फेरोमन ट्रॅप लावणे गरजेचे आहे. यासाठी सर्व जिनिंग प्रेसींग व्यवस्थापनाने कामाला लागावे. फेरोमन ट्रॅप लावल्यानंतर त्यातील कॅप्सुल नियमित बदलविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने योग्य नियोजन करा. पुढील आठवड्यापासून जिनींग प्रेसींगच्या तपासणीला सुरवात करावी. फेरोमन ट्रॅप हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा असून शेतक-यांच्या फायद्याचा आहे. त्यामुळे जिनिंग प्रेसींग व्यवस्थापनाने याबाबत अतिशय गांभिर्याने काम करावे, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
तत्पूर्वी नुकत्याच झालेल्या खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी म्हणाले, पीओएस मशीनद्वारे खतांच्या उपलब्धतेबाबत चालू खरीप हंगामामध्ये कनेक्टिव्हिटीची अडचण असल्यास त्वरीत निदर्शनास आणून द्या. गरज पडल्यास सर्व्हिस प्रोव्हायडर तज्ज्ञाची नेमणूक करून ही अडचण दूर करण्यात येईल. किटकनाशके, खते पुरवठा कंपन्या व कृषी विषयाशी संलग्नीत इतर एजंन्सीच्या बैठका त्वरीत लावाव्यात. शेतकरी / शेतमजूर किटकनाशकांची फवारणी करीत असल्यास त्यांना अनुदानावर संरक्षक किट देण्यासाठी योजना तयार करून सीएसआर अंतर्गत प्रस्ताव पाठवा. कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावासंदर्भात शेतक-यांना शिवारात फरदडविषयी माहिती द्या. तसेच ज्या ठिकाणी प्रादुर्भाव येण्याची शक्यता आहे त्याठिकाणी लक्ष केंद्रीत करून शेतक-यांना मार्गदर्शन करा, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या.
जिल्ह्यात खरीप हंगाम 2019 करीता एकूण 9 लक्ष 11 हजार लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. यात कापूस पिकासाठी 4 लक्ष 5 हजार हेक्टर, सोयाबीन 2 लक्ष 50 हजार हेक्टर, तूर 1 लक्ष 75 हजार हेक्टर, ज्वारी 50 हजार 300 हेक्टर, मूग व उडीद पिकासाठी प्रत्येकी दहा हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक बियाणे व खतांची मागणी खात्याकडे करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी