जिल्ह्याच्या विकासासाठी 100 टक्के निधी मिळणार – पालकमंत्री संजय राठोड

 




Ø उत्कृष्ट पंचायत समिती, ग्रामपंचायतींचा सत्कार

यवतमाळ, दि. 27 : कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे विविध विकास कामांसाठी 33 टक्केच निधी वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र संकटावर मात करून शासनाने ‘पुन:श्च हरीओम’ म्हणत नव्याने सुरवात केली आहे. त्यामुळे विकास कामांसाठी आता पूर्ण निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी 100 टक्के निधी मिळणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेमध्ये नुकताच उत्कृष्ट पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार तर मंचावर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जि.प. अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, महिला व बालकल्याण सभापती जया पोटे, समाजकल्याण सभापती विजय राठोड आदी उपस्थित होते.

विकासासाठी जिल्हा नियोजन समितीचा 100 टक्के निधी मिळणार आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, निधीमध्ये कोणतीही कपात होणार नाही. जनतेला दिलासा देण्यासाठी विविध विकासकामे पूर्ण करण्यावर भर असून प्रशासनाने नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे गरजेचे आहे. व्ही-तारा कंपनी जिल्ह्यात जवळपास पाच हजार कोटींची गुंतवणूक करीत असल्यामुळे रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. सायकल अगरबत्तीबाबत सामंजस्य करार झाले असून जिल्ह्यातील पाच हजार महिलांना रोजगार मिळणार आहे. अगरबत्ती निर्मितीच्या कामातून एक महिला 400 रुपये रोजमजुरी कमवू शकेल.

यावर्षी जलशक्ती मंत्रालयाकडून राबविण्यात आलेल्या सामुदायिक शौचालय अभियान अंतर्गत दारव्हा तालुक्यातील बोरी खुर्द ग्रामपंचायतीने देशातून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तर जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील राळेगाव, यवतमाळ, बाभुळगाव, दारव्हा, मारेगाव, वणी आणि केळापूर या सात पंचायत समित्यांनी वेळेपूर्वीच 100 उद्दिष्ट पूर्ण केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

जि.प.अध्यक्षा म्हणाल्या, ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषद कटिबध्द आहे. जि.प.च्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांकडून नेहमी सहकार्य मिळत आहे. विकास कामांसाठी अतिरिक्त निधीची तरतूद व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून सर्व अधिका-यांनी काम करावे. जि.प. अंतर्गत 100 गावे आदर्श म्हणून विकासीत केली पाहिजे, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, नाविण्यपूर्ण तसेच गुणवत्तापूर्वक कामांसाठी पालकमंत्र्यांकडून नेहमी आग्रह धरला जातो. जि.प.च्या प्रत्येक शाळेत ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षेचे वातावरण निर्माण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बोरी खुर्द ग्रामपंचायतीचा तसेच राळेगाव, यवतमाळ, बाभुळगाव आणि दारव्हा पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी आणि चमुचा सत्कार करण्यात आला. तसेच यशवंत पंचायत राज अंतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्या प्रशांत गावंडे, सुरेश चव्हाण यांचा गुणवंत कर्मचारी म्हणून विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन किशोरी जोशी यांनी केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे, शिक्षणाधिकारी दीपक चवणे, कृषी विकास अधिकारी श्री. माळोदे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी श्रीमती धोंडे, यशवंत पवार यांच्यासह पं.स. सभापती, जि.प.सदस्य, सरपंच आदी उपस्थित होते.

००००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी