लघु सिंचन योजनांच्या प्रगणना अंमलबजावणीबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

 


यवतमाळ, दि. 6 : केंद्र सरकारकडून राष्ट्रव्यापी लघुसिंचन योजनांची (0 ते 2000 हे. सिंचन क्षमता) आणि जलसाठ्यांची सहावी प्रगणना करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील लघुसिंचन योजनांच्या प्रगणना अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जिल्ह्यात साध्या विहिरी, उथळ, मध्यव व खोल कुपनलिका तसेच विविध पाणी साठवण असलेल्या जवळपास 90 हजार जागा आहेत. या सर्वांची सहावी प्रगणना करण्यासाठी जलसंपदा विभाग, कृषी विभाग, पैनगंगा पुनर्वसन, लघुपाटबंधारे विभागातील 152 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत ही प्रगणना पूर्ण करावयाची असून त्यासाठी ॲप व टेम्लेटबाबत पुढील आठवड्यात प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल. प्रत्येक कर्मचा-याला 15 गावातील पाणी साठवण जागांची मोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचा-यांनी हे काम प्राधान्याने करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

सहाव्या प्रगणनेमध्ये साध्या विहिरी, कुपनलिका, 0 ते 2000 हे. सिंचन क्षमतेचे लघुसिंचन योजना, धरण, कालवे, बंधारे, विमोचक, बंद नलिका वितरण प्रणाली इत्यादीमुळे केले जाणारे प्रवाही सिंचन आणि नदी, नाले, बंधारे, जलाशय इत्यादीवरील उपसा सिंचन योजना, नागरी आणि ग्रामीण भागातील जलसाठे, कृषी व मृदसंधारण विभागाकडील सिमेंट बंधारे, शेततळे, सिंचन विहिरी, भुजल सर्वेक्षण यंत्रणेसंबंधित कुपनलिकांची प्रगणना करण्यात येईल.

बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा संधारण अधिकारी सुहास गायकवाड, निम्न पैनगंगा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल वसुलकर, सुनील कोंडावार आदी उपस्थित होते.

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी