नागरिकांना त्वरीत मदत मिळण्यासाठी ‘प्रोजेक्ट- 112’ लवकरच कार्यान्वित - गृहमंत्री अनिल देशमुख

 




Ø क्रिकेट जुगारामधील मोठ्या सट्टेबाजांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश

यवतमाळ, दि. 21 : महिलेवर अत्याचार, अपघात, मोठी दुर्घटना, आग यासारख्या आपात्कालीन संकटात नागरिकांना त्वरीत मदत मिळण्यासाठी राज्यत ‘प्रोजेक्ट- 112’ लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्यात व जिल्ह्यात प्रशिक्षण सुरू झाल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

जिल्हा पोलिस मुख्यालयात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आदी उपस्थित होते.

आपात्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरीत मदत मिळवून देणे आपले प्रथम कर्तव्य आहे, असे सांगून गृहमंत्री देशमुख म्हणाले, यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांवर जीपीएस सिस्टीम लावण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणावरून माहिती मिळाली तर संपूर्ण यंत्रणा त्वरीत घटनास्थळी पोहचण्यास मदत होईल. यवतमाळमध्ये या अनुषंगाने पोलिस विभागांतर्गत 232 जणांच्या प्रशिक्षणाला सुरूवात झाली आहे. राज्यात 12500 जणांची पोलिस भरती करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील 5300 जणांच्या भरती संदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे. उर्वरीत पोलिस भरती दुस-या टप्प्यात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रिकेट बेटींग संदर्भात गृहमंत्री म्हणाले, नागपूर आणि यवतमाळमध्ये क्रिकेटवर सट्टा लावण्याचे मोठे प्रमाण आहे. नागपूरपेक्षाही यवतमाळ मुख्य केंद्र म्हणून पुढे आले आहे. यवतमाळ जिल्हा पोलिस विभागाने नुकतेच क्रिकेट जुगारासंदर्भात मोठी कारवाई केली, ही निश्चितच अभिनंदनाची बाब आहे. मात्र तरीसुध्दा संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून यात समाविष्ठ असलेल्या मोठमोठ्या सट्टेबाजांवर कडक कारवाई करावी, तसेच जिल्ह्यातील वादग्रस्त मालमत्ता संदर्भात गुन्ह्यांची माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई करा, असे निर्देशही त्यांनी दिले. तत्पूर्वी गृहमंत्र्यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच जिल्ह्यात सर्वोत्कृष्ठ अपराधसिध्दी केल्याबद्दल तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, पोलिस उपनिरीक्षक मंगेश भोयर, सहायक पोलिस उपनिरीक्षक दिनकर चौधरी आणि पोलिस नाईक बबलू चव्हाण यांना प्रमाणपत्र व धनादेश देऊन गृहमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.        

जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी पोलिस विभागाचा आढावा सादर केला. यात गुन्हे विश्लेषण, जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत केलेली कारवाई, गुन्हे दोषसिध्दी, स्त्रियांवरील अत्याचा-यांच्या गुन्ह्यात झालेली घट, अवैध वाहतूक प्रवासी नियंत्रण, अपघातप्रवण स्थळे निश्चित करून अपघातात झालेली घट, भरोसा सेलची कामगिरी, सायबर सेफ वुमेन आणि महिला सुरक्षा कार्यशाळा, उपविभागीय स्तरावर राबविण्यात आलेला ‘पोलिस दरबार’ उपक्रम, जेष्ठ नागरिक सुरक्षा कक्षाची स्थापना, कोरोना मध्ये पोलिसांची अतुलनीय कामगिरी, पोलिस गृहनिर्माण प्रकल्प, पदनिर्मितीबाबात प्रलंबित प्रस्ताव, पांढरकवडा, वणी, पुसद, दारव्हा येथे स्वतंत्र वाहतूक शाखा निर्माण करणे आदींचा समावेश होता.

तर जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी कोव्हीड संदर्भात जिल्ह्याचा पॉझेटिव्ह रुग्णांचा दर, मृत्युदर, लसीकरण मोहिम, बर्ड फ्ल्यू आदींबाबत गृहमंत्र्यांना अवगत केले. इतर राज्यांप्रमाणे कोव्हीडची लस सुरवातीला संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिका-यांना दिली तर समाजात चांगला संदेश जाईल, असे गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

      बैठकीला महामार्ग पोलिस अधिक्षक श्वेता खेडकर, पुसदचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार तसेच पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी