शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या मदतीसाठी कंपन्या व बँकांनी समोर यावे

 


  

Ø जिल्हाधिका-यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 13 : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शेतीपुरक व्यवसायासाठी मदत म्हणून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या संकल्पनेतून ‘मिशन उभारी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. घरचा आधार गेल्यानंतर अशा कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी गाय, म्हशी, शेळी वाटप किंवा सिंचनासाठी विहिरींचा लाभ देण्यात येतो. यासाठी निधीची आवश्यकता असल्यामुळे जिल्ह्यातील विविध कंपन्या आणि बँकांनी सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) मधून या कुटुंबांना मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आर. डब्ल्यू. खेरडे आदी उपस्थित होते.

दर आठवड्याला शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रकरणांचा जिल्हा मुख्यालयात आढावा घेण्यात येतो, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकरी कुटुंबांना नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. घरचा आधार गेल्यावर अनेक समस्यांचा सामना कुटुंबियांना करावा लागतो. त्यामुळे शेतीपुरक उदरनिर्वाहाचे साधन मिळावे, यासाठी सिंचन विहीर, शेतीला कुंपन, गाय-म्हैस, शेळी गटाचे वाटप करण्याचे नियोजन आहे. आढाव्यादरम्यान जवळपास 30 कुटुंबियांनी अशी मागणी केली आहे. त्यासाठी कंपन्या आणि बँका समोर आल्या तर या कुटुंबांना शेळी, गाय, म्हैस वाटप करता येईल.

सीएसआर निधीसाठी जिल्हास्तरावर एका समितीचे गठन करण्यात आले आहे. कंपन्या किंवा बँका आपले नाव आणि लोगो वापरूनसुध्दा आत्महत्याग्रस्त कुटुंबांना गायी, म्हशी, शेळी खरेदी करून देऊ शकतात. या उपक्रमाची कंपन्या किंवा बँकानासुध्दा आपल्या वार्षिक अहवालात नोंद घेता येईल. प्रशासन नेहमी सर्वांना सहकार्य करीत आले आहे. त्यामुळे आता ‘मिशन उभारी’ साठी कंपन्या आणि बँकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

यावेळी वेस्टर्न कोल्डफिड, एसीसी सिमेंट यांच्यासह विविध कंपन्या आणि बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उत्कृष्ट कर्जवाटप करणा-यांचा सत्कार : खरीप हंगाम 2020 मध्ये उत्कृष्ट कर्जवाटप करणा-या बँकांच्या प्रतिनिधींचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात कॉर्पोरेशन बँक, ॲक्सीस बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. गत वर्षी जिल्ह्यात 73 टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले असून आगामी खरीप हंगामात 80 टक्क्यांच्या वर पीक कर्जवाटप करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

 

०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी