जिल्हाधिका-यांनी घेतला कोव्हीड लसीकरण अंमलबजावणीचा आढावा

 


Ø योग्य काळजी घेण्याच्या सुचना

यवतमाळ, दि. 13 : कोव्हीड लसीकरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्ह्यात 16 जानेवारीपासून करण्यात येत आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आरोग्य यंत्रणेच्या नियोजनाचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधिक्षक डॉ. खांडेराव धरणे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, डॉ. सुभाष ढोले, डॉ. गिरीष जतकर आदी उपस्थित होते.

16 जानेवारी रोजी जिल्ह्यातील सहा केंद्रावर प्रत्यक्ष लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, कोव्हीडच्या लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करा. लसींची साठवणूक, वाहतूक आदी बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे साठवणूक केंद्र तसेच ज्या सहा ठिकाणी लसीकरण होणार आहे, तेथे पोलिस विभागाने सुरक्षा पुरवावी. लसीकरणाबाबत योग्य काळजी घेऊन लस घेणारा लाभार्थी हा 30 मिनिटे निरीक्षण कक्षामध्ये सुरक्षित असावा. या बाबीकडे आरोग्य यंत्रणेने विशेष लक्ष द्यावे, अशा सुचना केल्या. तसेच जिल्ह्यात किती लस उपलब्ध होतील, त्याची वाहतूक कशी, उपलब्ध कुठून होणार, साठवणुकीची व्यवस्था काय, आदी माहिती जाणून घेतली.

 

जिल्ह्यात 16 जानेवारी रोजी दारव्हा, पांढरकवडा पुसद येथील उपजिल्हा रुग्णालय, वणी आणि उमरखेड येथील ग्रामीण रुग्णालय आणि सावरगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरण करण्यात येईल. एका ठिकाणी 100 लाभार्थी याप्रमाणे 600 लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी सिरम इन्स्टिट्यूटची ‘कोव्हीशिल्ड’ आणि भारत बायोटेक लिमिटेडची ‘को-व्हॅक्सीन’ या लसींचा पुरवठा येत्या दोन दिवसात होईल. जिल्ह्यात एकूण 83 कोल्डचेन अंतर्गत 108 रेफ्रिजरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 15253 हेल्थ वर्कर लाभार्थ्यांचा डाटा संकलित करण्यात आला असून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांतर्गत 3396, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत 7064 आणि खाजगी रुग्णालयाचे 4793 लाभार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती सादरीकरणात डॉ. सुभाष ढोले यांनी दिली.

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी