'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत पालकमंत्र्यांनी दिली हरीत शपथ

 





v जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 1 : पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी निगडीत पंचतत्वांचे संवर्धन करण्यासाठी संपूर्ण राज्यात 'माझी वसुंधरा' हे अभियान राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपण करून उपस्थितांना पर्यावरण संवर्धनासाठी 'हरीत शपथ' दिली.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, नगर पालिका प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर राठोड, माहिती व सुचना केंद्राचे प्रमुख राजेश देवते आदी उपस्थित होते.

निसर्गाशी निगडीत असलेल्या पंचतत्वांच्या संवर्धनाकरीता नववर्षाचे औचित्य साधून 1 जानेवारी 2021 रोजी नवसंकल्प म्हणून हरीत शपथीचे आयोजन जिल्ह्यातील प्रत्येक नगर परिषदेमध्ये करण्यात आले. यात जवळपास संपूर्ण जिल्ह्यात दोन हजारांच्या वर नागरिक सहभागी झाले.

सदर अभियान हे नगर परिषद आणि नगर पंचायतीच्यावतीने राबविण्यात येणार असून यवतमाळ जिल्ह्यात 10 नगर परिषदा व सात नगर पंचायती आहेत. सदर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक नगर परिषद / नगर  पंचायतीमार्फत अभियानाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत 17450 वृक्षारोपण करण्यात आाले असून यात प्रामुख्याने कडूनिंब, गुलमोहर, वड आणि पिंपळसारख्या भारतीय प्रजातींच्या वृक्षांना प्राधान्य देण्यात आले आहे.

तसेच जिल्ह्यात हरीतकरण वाढविण्यासाठी उद्याने संवर्धन व सौंदर्यीकरण, रस्त्याच्या बाजुला वृक्षारोपण यासारखे उपक्रम सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरामुक्त शहरासाठी स्वच्छ सर्वेक्षण - 2021 व जीएफसी स्टार रेटींग सारखे उपक्रम राबविण्यात येत आहे. प्लॅस्टिक निर्मुलनाच्या दृष्टीने जिल्ह्यात आतापर्यंत 92 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. जलसंधारण व पुर्नवापर करण्याच्या दृष्टीने यवतमाळ, नेर, दिग्रस आणि दारव्हा या ठिकाणी एसटीपी उभारण्याचे काम सुरू आहे. नुतणीकरणयोग्य उर्जा स्त्रोताच्या वापरास प्रोत्साहन व उर्जेची बचत होण्यासाठी जिल्ह्यात 42971 एलईडी पथदिवे लावण्यात आले आहे.

'माझी वसुंधरा' या मोहिमेंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'ई-प्लेझ' चे अनावरण करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपले योगदान देऊन majhivasundhara.in या संकेतस्थळावर ई-प्लेझ (ऑनलाईन शपथ) घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी वृक्षारोपण करून सर्व विभागप्रमुख व  कर्मचा-यांना हरीत संवर्धनाची शपथ दिली.

000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी