पीक कर्जदर ठरविण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

 


यवतमाळ, दि. 8 : बँकेचे सन 2020-21 करीता खरीप, रब्बी, उन्हाळी व बागायती पिकांचे पीक कर्जदर तसेच पशुपालन व मत्स्य व्यवसायासाठी खेळते भांडवली कर्जदर ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या तज्ज्ञ समितीची बैठक घेण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, नाबार्डचे दीपक पेंदाम, डॉ. प्रमोद यादगिरवार आदी उपस्थित होते.

प्रत्येक पिकासाठी पीक पेरणीपासून ते पीक हाती येईपर्यंतचा उत्पादन खर्च व उत्पन्न तसेच उत्पादन झालेल्या पिकांची बाजार भावाप्रमाणे किंमत, कृषी विभागाने व कृषी विद्यापिठांनी दर्शविलेले उत्पादन खर्च व उत्पन्न या बाबींचा पीक कर्जदर ठरवितांना विचार करण्यात आला आहे. पीक कर्जदर किमान व कमाल या रेंजमध्ये प्रती एकरी ठरविण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, हवामान, कोरडवाहू व ओलित क्षेत्र, शेतीची पारंपरिक व आधुनिक पध्दती याबाबींचासुध्दा विचार करण्यात आला आहे.

त्यानुसार तज्ज्ञ समितीने सन 2020-21 खरीप पिकांसाठी प्रति एकरी खालील दर निश्चित केले आहे. बीटी कापूस ओलित करीता किमान 22500 आणि कमाल 25000 रुपये, बीटी कापूस कोरडवाहूकरीता किमान 17800 आणि कमाल 20000, तूरकरीता किमान 22500 आणि कमाल 25000 रुपये, सोयाबीनकरीता किमान 17800 आणि कमाल 20000 रुपये पीक कर्जदर आहे. तर रब्बी पिकांमध्ये गहू आणि हरबरा ओलितकरीता किमान 15600 आणि कमाल 17800 रुपये, उन्हाळी पिकांमध्ये  उन्हाळी भुईमुंग किमान 17800 आणि कमाल 22250 रुपये, उन्हाळी मुंग किमान 10680 आणि कमाल 12100, उन्हाळी तीळ किमान 9800 आणि कमाल 10700 दर ठरविण्यात आले आहे.

सोबतच पशुपालन आणि मत्स्यव्यवसायाकरीता खेळते भांडवली कर्जदर ठरविण्यात आले असून 10 आर. क्षेत्रफळ असलेल्या शेततळ्याकरीता 28750 रुपये, 20 आर. क्षेत्रफळ करीता 40250 आणि 40 आर. क्षेत्रफळ असलेल्या शेततळ्याकरीता 57500 रुपये, मासेमारीमध्ये एक हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या मोठ्या तलावाकरीता (एक युनिट) 86250 रुपये, नदी, तलावामध्ये छोट्या नावेच्या सहाय्याने 8625 रुपये ठरविण्यात आले आहे. पशुपालन अंतर्गत 1 म्हैस (1 युनिट) 20000 रुपये, 1 गाय (1 युनिट) करीता 15000 रुपये, कुक्कुटपालन अंतर्गत एक हजार बर्ड (1 युनिट) करीता 72500 रुपये आणि शेळीपालन अंतर्गत शेळ्या (10 अधिक 1)(1 युनिट) करीता 18000 ठरविण्यात आले आहे.

बैठकीला विविध विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी प्रतिनिधी म्हणून चंदू चांदोरे, माणिक कदम, हेमंत ठाकरे आणि अरविंद भेंडे उपस्थित होते.

०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी