लसीकरण मोहिमेचा जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

 


      यवतमाळ  दि.20 :  कोव्हीड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ 16 जानेवारी झाला असून जिल्ह्यात पांढरकवडा, पुसद आणि दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच उमरखेड आणि वणी येथील ग्रामीण रुग्णालय या पाच केंद्रांवर ही मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेच्या प्रगतिचा आढावा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.

            बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.

            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील कर्मचा-यांना ही लस देण्यात येणार असल्याने सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिक्षक यांना अवगत करून कर्मचा-यांना लसीकरणाबाबत जनजागृती करा. शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया करून ही लस निर्माण केली आहे, त्यामुळे अजिबात घाबरण्याची गरज नाही. ज्या नागरिकांना लसीकरणाबाबत शंका आहेत, त्यांचे समाधान करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिका-यांनी कार्यशाळांचे आयोजन करावे. तसेच नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे जिल्हा नियंत्रण कक्षामधील 1077 हा टोल फ्री क्रमांक आणि 07232-255077, 07232-240720, 07232-240844 हे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पाचही केंद्रावर प्रत्येक आठवड्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनीवार या चार दिवशी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. 19 जानेवारी पर्यंत जिल्ह्यात 541 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले असून यात 226 पुरुष आणि 315 महिला कर्मचा-यांचा समावेश आहे. पांढरकवडा केंद्रावर 130 लाभार्थी, पुसद येथे 120, दारव्हा 78, उमरखेड 108 आणि वणी येथील केंद्रावर 105 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापैकी कोणालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. तसेच त्यांना कोणताही त्रास झाला नाही.

बैठकीला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगडपिल्लेवार, डॉ. सुभाष ढोले, डॉ. विजय डोंबाळे आदी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी