रब्बीसाठी सुधारित पीक विमा योजना; 15डिसेंबरपूर्वी सहभागी व्हा शेतकरी बांधवांना कृषी विभागाचे आवाहन
रब्बीसाठी सुधारित पीक विमा योजना; 15डिसेंबरपूर्वी सहभागी व्हा
शेतकरी बांधवांना कृषी विभागाचे आवाहन
यवतमाळ, दि. 27 (जिमाका) : जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये रब्बी हंगाम 2025-26 पासून सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आली असून, वातावरणातील अनियमितता, कीडरोग आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून शेतकऱ्यांना या योजनेतून संरक्षण मिळणार आहे.
जिल्ह्यात यंदा सव्वा लाख हेक्टरवर हरभरा आणि साठ हजार हेक्टरवर गहू पेरणी अपेक्षित आहे. गहू व हरभरा पिकासाठी विमा काढण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर, तर उन्हाळी भुईमूगासाठी 31 मार्च निश्चित करण्यात आली आहे.
हरभरा पीकासाठी प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम 36 हजार रू. असून, विमा हप्ता 360 रु. आहे. गहू बागायत पीकासाठी प्रति हे. विमा संरक्षित रक्कम 45हजार असून विमा हप्ता 450 रु. आहे. उन्हाळी भुईमूग पीकासाठी प्रति हे. विमा संरक्षित रक्कम 40 हजार 600 रू. असून, विमा हप्ता 101.50 रू. आहे.
पीक विम्यासाठी ई-पीक पाहणी आणि फार्मर आयडी अनिवार्य आहे. शेतक-यांनी शेतात पीक नसताना विमा काढू नये. शेतात पीक नसताना विमा काढल्यास संबंधित शेतकऱ्याला कृषी विभागाच्या इतर योजनांपासून वंचित राहावे लागू शकते.
पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रात, केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टलवर किंवा मोबाईल अॅपद्वारे विमा काढावा. कोणतीही अडचण आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.
0000000
Comments
Post a Comment