जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्ह्यात “हमारा शौचालय, हमारा भविष्य” मोहिमेला प्रारंभ
यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहिम १९ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. ही मोहिम १० डिसेंबर मानवाधिकार दिनापर्यंत राबविण्यात येणार असून नागरिकांच्या आरोग्य, सन्मान आणि सुरक्षिततेसाठी शौचालयांच्या सुस्थितीवर विशेष भर देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. “शौचालय ही केवळ सुविधा नसून आरोग्य आणि सुरक्षिततेची हमी आहे, असे ते म्हणाले.
मोहिमेदरम्यान गावागावांतील वैयक्तिक व सामुदायिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती, देखभाल व सुशोभीकरण करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. दुरुस्तीअभावी गैरसोयी निर्माण करणाऱ्या सार्वजनिक शौचालयांची तात्काळ नोंद घेऊन आवश्यक कामे करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या मोहिमेत शाळा, स्वयंसहाय्य गट, युवक मंडळे, निवृत्त सैनिक, सामाजिक संस्था यांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार असून स्वच्छता, सुरक्षित मलनिस्सारण आणि पर्यावरणपूरक शौचालय वापरासंदर्भातील जनजागृती केली जाणार आहे. ग्रामस्थांना त्यांच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्ती, रंगरंगोटी आणि नियमित स्वच्छतेसाठी प्रोत्साहित करण्यात येईल.
२१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबविले जाणार असून मोहिमेच्या अखेरीस उत्कृष्ट देखभाल करणाऱ्या वैयक्तिक व सामुदायिक शौचालयांना विशेष गौरव चिन्ह प्रदान केले जाणार आहे. १० डिसेंबर रोजी मोहिमेचा समारोप करून “उत्कृष्ट शौचालय पुरस्कार” जाहीर करण्यात येतील.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर यांनी केले आहे
000000
Comments
Post a Comment