नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मतदानाच्या दिवशी सर्व कामगार मतदारांना सुट्टी देण्याचे आवाहन
यवतमाळ,दि. २८ (जिमाका) : लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १३५(बी) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. त्यानुसार दि. २ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी निवडणूक क्षेत्रातील मतदारांना मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी रा. रा. काळे यांनी केले आहे.
सुट्टी किंवा सवलत न मिळाल्याने मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागू नये. यासाठी दि.2 डिसेंबर 2025 रोजी नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या दिवशी निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे राज्य निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे.
ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील (उदा. खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी, हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्सर, रिटेलर्स इ.)
अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
00000
Comments
Post a Comment