वणी येथे कृषी संवाद कार्यक्रमाचा शुभारंभ ‘एफपीओ’च्या माध्यमातून एकत्र येऊन पूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योगांना चालना द्यावी -जिल्हाधिकारी विकास मीना
यवतमाळ, दि. 26 (जिमाका) : जिल्ह्यातील शेतीचे स्वरूप बदलण्यासाठी आणि शेतीसंबंधित विविध जोडधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या विशेष पुढाकाराने जिल्हा प्रशासनातर्फे “कृषी संवाद”हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याच्या पहिला सत्राचा शुभारंभ आज वणी येथे झाला.
शेतीव्यवसायात उत्पादनवाढीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब, पाणी व इतर बाबींचे काटेकोर नियोजन करतानाच, शेतक-यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एकत्र येऊन पूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योगांना चालना द्यावी जेणेकरून उत्पादनवाढीबरोबरच शेतकरी बांधवांच्या उत्पन्नातही वाढ होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी केले.
वणी येथील वसंत जिनींग हॉल येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ झाला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, पांढरकवड्याचे उपविभागीय कृषी अधिकारी चंदन निघोट, तालुका कृषी अधिकारी वणी दिलीप राऊत, तहसीलदार वणी निखिल धुळधर, गटविकास अधिकारी किशोर गजलवार, तसेच कृषी विभागातील अधिकारी–कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मीना म्हणाले की, नियोजनबद्ध पद्धतीने आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास शेतकऱ्यांना मोठे फायदे होऊ शकतात. शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करुन जोडधंदे सुरू करणे, अन्नप्रक्रिया उद्योग, एकत्रित विक्री केल्यास शेतमालाला अधिक बाजारभाव मिळू शकतो आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. अशा उपक्रमांसाठी केंद्र शासनाच्या, तसेच राज्याच्या कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो. त्याचा लाभ घेऊन शेतकरी बांधवांनी एकजूट होत आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतक-यांशी संवाद
जिल्हाधिकारी श्री. मीना यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्रत्यक्ष उतर देत संबंधित विभागांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. कार्यक्रमात कैलास डोंगरकर, विकास क्षीरसागर, ललित यावळे, सचिन टोंगे या नाविन्यपूर्ण शेतकऱ्यांनी आंबा, मोसंबी, बांबू, शेवगा, पेरू आदी फळपीकांची सांधेजोड लागवड आणि शाश्वत शेती मॉडेलविषयी तसेच स्वयंचलित पोल्ट्री फार्मचे व्यवस्थापन, रेशीम उद्योग, धागा निर्मिती प्रक्रिया, मधमाशी पालन, मध उत्पादन व त्यापासून तयार होणाऱ्या विविध पदार्थांविषयी माहिती दिली. तसेच संबंधित योजनांविषयी मार्गदर्शन केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी फळबाग लागवड, तृतीय पिक लागवड, प्रधानमंत्री सूक्ष्म-उद्योग योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, महाविस्तार अॅप आदी योजनांची सविस्तर माहिती दिली. नंतर पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप (Farmer Cup) या अभिनव उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली.
या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना शेतजमिनीचे काटेकोर नियोजन, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, मातीची चाचणी, विपणन, आणि खर्चावर नियंत्रण या बाबतीत प्रेरित करणे हा आहे. या संदर्भात पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक उज्ज्वल बोलवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि सर्व शेतकरी बंधूंनी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यमंत्री फेलो कुणाल पाटील यांनी केले.
000000



Comments
Post a Comment