श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन विविध उपक्रमांद्वारे माहिती सर्वदूर पोहोचवा - जिल्हाधिकारी विकास मीना

यवतमाळ, दि. २८: ‘हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर’ यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. विदर्भात नागपूर येथे ७ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असून, विविध माध्यमांतून या कार्यक्रमाची माहिती जिल्ह्यात सर्वदूर पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज येथे दिले. कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक महसूलभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरूद्ध बक्षी, महोत्सव समितीचे सदस्य, गुरूद्वारा समितीचे प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते. श्री गुरू तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरू आहेत. मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करीत असताना ते शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, मानवता, करूणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन आणि हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन जानेवारी महिन्यात नांदेड येथे करण्यात आले आहे. या गौरवशाली इतिहासाच्या स्मृती सोहळ्यानिमित्त शिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाजाचे गुरुबंधुत्व नाते अधिक दृढ होणार आहे. समन्वय समितीच्या माध्यमातून विविध यंत्रणांतर्फे प्रचार व प्रसाराचे कार्य यशस्वीपणे पार पाडण्यात यावे. शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमातून निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. चित्ररथाच्या माध्यमातून गावोगाव संदेश पोहोचविण्यात येत आहे. या सर्व उपक्रमांची प्रचार व प्रसिद्धी सर्वदूर करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. मीना यांनी दिले. महोत्सवाची माहिती देणा-या पत्रकाचे प्रकाशनही यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले. श्री गुरू तेग बहादूर यांची शहादत व योगदान हे धर्म आणि मानवतेच्या रक्षणाचे तेजस्वी प्रतीक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याचा आणि श्रद्धेचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी महेश चव्हाण, उत्तम माळवी, पंजाबराव पवार आदी यावेळी उपस्थित होते. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस