न.प., न. पं. सार्वत्रिक निवडणूक जिल्हाधिका-यांकडून सुरक्षाविषयक आढावा निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे काटेकोर पालन व्हावे निवडणुकीदरम्यान कुठेही गैरप्रकार घडता कामा नये -जिल्हाधिकारी विकास मीना
यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने दि. 2 डिसेंबर रोजी मतदान व दि. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने मतदान केंद्राच्या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ व आवश्यक बाबींची पूर्तता व्हावी. निवडणूक सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या आदेशांचे काटेकोर पालन व्हावे. कुठेही गैरप्रकार घडता कामा नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यातील न. प., न. पं. सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने सुरक्षाविषयक बाबींचा आढावा जिल्हाधिका-यांनी महसूलभवनात बैठकीद्वारे घेतला, त्यावेळी ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, नगरपरिषद प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त रोहिदास दोरकुळकर आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मीना म्हणाले की, मतदानाचा दिवस, आदला दिवस, मतमोजणीचा दिवस या कालावधीत पालन करावयाच्या सर्व बाबींविषयी सुस्पष्ट निर्देश आयोगाने दिले आहेत. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे. मतदान केंद्रांवर विशेषत: संवेदनशील केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त ठेवावा. प्रत्येक पोलीस पथकात महिला कॉन्स्टेबलचा समावेश असावा. वीजपुरवठा अखंडित ठेवावा. त्यादृष्टीने आवश्यक ठिकाणी पर्यायी व्यवस्थाही असावी.
निवडणूकीत कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे राखली जावी. कुठेही प्रलोभन, आमिषाचा वापर होता कामा नये. आचारसंहितेचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कारवाई करावी. पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन विभाग यांनी आवश्यक तपासण्या वेळोवेळी कराव्यात. सर्व यंत्रणांनी जिल्ह्यात निवडणूका शांततामय, सुरळीत व निर्भय वातावरणात पार पाडण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.
000000



Comments
Post a Comment