एमआयडीसीमध्ये सेंट्रल बँकेतर्फे एमएसएमई कर्ज उपलब्धता शिबिर संपन्न
यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : एमआयडीसी यवतमाळ येथे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय अमरावती आणि एमआयडीसी यवतमाळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांसाठी कर्ज उपलब्धता कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. शाकंबरी जिनिंग कंपनीच्या प्रांगणात पार पडलेल्या या कॅम्पला उद्योजक, नवीन स्टार्ट-अप व्यावसायिक, महिला उद्यमी आणि बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एमआयडीसी असोसिएशनचे सचिव आनंद भुसारी, सदस्य अनिल भारतीय व ज्ञानेश्वर खताडे उपस्थित होते. या कॅम्पमध्ये उद्योग व्यवसायासाठी उपलब्ध विविध एमएसमएई कर्ज योजना, व्याजदरातील सवलती, क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट (CGTMSE) अंतर्गत मिळणाऱ्या हमी सुविधा तसेच शासकीय अनुदान योजनांची सविस्तर माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी उद्योजकांना दिली.
एमएसएमई आऊटरीच कार्यक्रमांतर्गत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे एकूण १९ कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणांना तत्काळ मंजुरी देण्यात आली. याशिवाय प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मुद्रा योजना, उद्यम नोंदणी प्रक्रिया, डिजिटल पेमेंट्स, महिला उद्योजकांसाठी विशेष वित्तीय योजना आणि उद्योग क्षेत्रातील वित्तीय साक्षरता याबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
सदर कार्यक्रमास सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक (क्षेत्रीय कार्यालय अमरावती) प्रशांत बिरादार, जिल्हा अग्रणी प्रबंधक यवतमाळ ज्ञानेश्वर टापरे, तसेच शाखा वरिष्ठ प्रबंधक जयंत धकिते व इतर अधिकारी उपस्थित होते.सर्व उद्योजक,ग्राहक आणि मान्यवरांचे सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे आभार मानण्यात आले.
0000000
Comments
Post a Comment