विविध उपक्रमांनी बालहक्क सप्ताह साजरा

यवतमाळ, दि. 25 (जिमाका) : महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच स्वयंसेवी संस्थांमधील बालकांच्या सहभागीने बाल हक्क सप्ताह दिनांक १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला. सप्ताहाची सुरुवात शासकीय बालगृह/निरीक्षणगृह, यवतमाळ येथे करण्यात आली. याच दिवशी बालदिनही आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शासकीय बालगृह व निरीक्षणगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असणारी १२ मुले तसेच ५ विधी संघर्षग्रस्त मुले उपस्थित होती. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विशाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. १४ नोव्हेंबर रोजी दिशा संस्था सामाजिक कार्यकर्ते कुंदन राजेंद्र बोंद्रे यांनी तसेच सुखाय फाउंडेशन, यांनी संयुक्तपणे कार्यक्रमाला विशेष सहकार्य केले. उद्बोधनानंतर सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा, विविध खेळ, तसेच प्रवेशितांसाठी आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या कोमल गजभिये व पाटील यांचे विशेष योगदान राहिले. या प्रसंगी अधीक्षक गजानन जुमळे, जिल्हाबाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर, संरक्षण अधिकारी संस्थात्मक अविनाश पिसूर्डे, चाईल्ड हेल्पलाईनच्या पूनम किनाके, शुभम कोन्डलवार, पूजा शेलारे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तसेच भारताचे प्रथम पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुले म्हणजे देवाघरची फुले” या भावनेतून प्रवेशितांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी बालकांचे हक्क, शिक्षणाचे महत्त्व, सुरक्षित व उज्ज्वल भविष्याची गरज याबाबत मार्गदर्शन केले. बालदिन व बाल हक्क सप्ताहाच्या शुभेच्छा देत सर्वांनी स्वतःच्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय बालगृहातील समुपदेशिका पूजा राठोड,सुनील हारगुडे, अविनाश राऊत, मंगेश वाघाडे, आकाश खांदवे, आनंद पवार तसेच सुरक्षा रक्षक यांनी परिश्रम घेतले. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस