आरोग्य विभागातर्फे जिल्हा समन्वय समितीची सभा, न्यूमोनियावर मात करण्यासाठी ‘सांस मोहिम’ ‘सांस मोहिम’ गावोगाव प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी विकास मीना
यवतमाळ,दि. 25 (जिमाका) : देशामध्ये एकूण बालमृत्यूंपैकी सरासरी 16.3 टक्के बालमृत्यू न्यूमोनियामुळे होत असल्याचा आरोग्यतज्ज्ञांचा अहवाल आहे. या गंभीर आजाराची व्याप्ती लक्षात घेऊन 0 ते 5 वर्षे वयोगटातील न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठी ‘मिशन सांस इनिशिएटिव्ह’ गावोगाव प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज येथे दिले.
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे न्यूमोनिया आजारविषयक जनजागृती तसेच, न्यूमोनियापासून संरक्षण, प्रतिबंध व उपचारांसाठी सांस मोहिम जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा समन्वय समितीची सभा महसूल भवनात जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत झाली, त्यावेळी ते बोलत होते.
बालकांमधील न्यूमोनियाचा प्रतिबंधासाठी तपासणी, उपचारांबरोबरच बचाव करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सामाजिक स्तरावर प्रभावी जनजागृती करावी. विविध संस्था, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागासह मोहिमेत अधिकाधिक लोकसहभाग मिळवावा, असे निर्देश श्री. मीना यांनी यावेळी दिले.
मोहिमेचे उद्दिष्ट्य : नॅशनल चाइल्डहूड न्यूमोनिया मॅनेजमेंट 2019 च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे. जनजागृती करणे. पाच वर्षाखालील बालकांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे त्वरित ओळखणे व उपचार करणे. तीव्र न्यूमोनियाच्या रुग्णांकरिता उपचाराकरिता आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष ढोले व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्या मार्गदर्शनात मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी युवराज मेहत्रे, जिल्हा शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, उपजिल्हा शिक्षणाधिकारी वंदना नाईक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतीकुमार नावंदीकर, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. नितेश उपाध्याय, विशाल जाधव बालविकास प्रकल्प अधिकारी, डॉ.केशवानी, डॉ. नैताम, संजय देशपांडे लॉयन्स क्लब, डॉ. खोवरे,डॉ. अनिल घोडे निमा संघटना, डॉ. स्मिता पेटकर जिल्हा साथरोग अधिकारी, कैलास जवंजाळ जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी, कांचन गादे, सुचिता ठाकरे, चंचला मुंदाने, प्रवीण बोपचे व आयएफएम उपस्थित होते.
0000000

Comments
Post a Comment