विद्यार्थ्यांनी राबविला अभिरूप मतदान उपक्रम > मतदारजागृती अभियान जिल्हाधिका-यांचा सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद व कौतुक

यवतमाळ,दि. 28 (जिमाका) : मतदार जागृती अभियानात यवतमाळ येथील गोधनी रस्त्यावरच्या जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे अभिरुप मतदान कार्यक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेनुसार ही अभिरूप मतदान प्रक्रिया राबवली. या उपक्रमाचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी कौतुक केले. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्ये विकसित करण्यासाठी व निवडणूक प्रक्रिया अनुभवण्यासाठी चुनावी पाठशाळा (अभिरुप मतदान) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी यांच्या सुचनेनुसार यवतमाळच्या शासकीय शाळेत आज संपुर्ण निवडणूकीची तयारी करण्यात आली. यामध्ये शाळेतील जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्वप्रथम काही विद्यार्थ्यांनी निवडणूकीकरीता आपले नामांकन सादर केले. प्राप्त नामांकन अर्जाची निवडणूक अधिका-यांनी छाननी करुन यादी प्रसिध्द केली. उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारांकरिता मतदान केंद्रे बनविण्यात आली. लहान विद्यार्थ्यांनी मतदान केंद्रावरील पोलीस कर्मचारी बनण्याची भूमिका आश्चर्यकारकरीत्या जिवंतपणे साकारली. विशेष म्हणजे सजविलेल्या मतदान कक्षात मुली आणि मुलांनी रांगेत येऊन मतदानाचा हक्क बजावला. शाळा प्रतिनिधी पदासाठी झालेल्या या निवडणूकीत एकून 242 मतदान झाले. यामध्ये 232 मते वैध ठरली तर 10 मते नोटावर गेली. वाणिज्य शाखेचा अकरावीचा विद्यार्थी आर्यन अरुण राठोड, शाळा कप्तान पदी तर रोशनी मारोती कांबळे ही विद्यार्थीनी उप कप्तान पदावर निवडून आली. निवडणूक निर्णय अधिकारी महणून मुख्याध्यापक साहेबराव पवार तर निकाल तपासणी अधिकारी म्हणून डॉ. सुनिल गावंडे यांनी काम पाहीले. हा उपक्रम बघण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना, शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंन्द्र काटोलकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक किशोर पागोरे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यवतमाळ पोपेश्वर भोयर, विस्तार अधिकारी श्रीमती दीपिका गुल्हाने, साधन व्यक्ती श्रीमती माधुरी दिंडोकर, साधन व्यक्ती आशीया शेख यांनी शाळेला भेट दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार, शिक्षक डॉ. सुनिल गावंडे, अहमद असलम, प्रकाश साबळे, संदीप मारगाये, सुनिल बरमदे, अन्वर अहमद, हिमांशू गिराम, शुभांगी शंभरकर, फरीन अंजुम, नितीन पंधरे, अर्जुमंद खानम, अमित अस्वार राजकुमार यादव प्रविणी धाबर्डे, किशोर इंगळे, स्मिता मेश्राम, मुग्धा बन्सोड, नितीन धोटकर यांनी परिश्रम घेतले. उपक्रमातील नियोजन आणि गुणवत्ता बघून जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले. प्रशासनाच्या वतीने निवडणूक आयोगाला या उपक्रमाच्या उत्कृष्ट सादरीकरणाची माहिती कळविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस