गोवर-रुबेला लसीकरण मोहीम 100 टक्के बालकांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवा – सीईओ जलज शर्मा




यवतमाळ, दि. 23 : गोवर या रोगाचे निर्मुलन होण्याकरीता तसेच रुबेला या रोगावर नियंत्रण मिळविण्याकरीता संपूर्ण राज्यात नोव्हेंबरमध्ये गोवर - रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. 9 महिने पूर्ण व 15 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील जवळपास 7 लक्ष बालकांना या मोहिमेदरम्यान लस देण्यात येणार आहे. या लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी यंत्रणेने 100 टक्के बालकांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवावे, अशा सुचना जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी केले.
गोवर-रुबेला लसीकरणच्या जिल्हा कार्यबल गटाच्या बैठतीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी मनोज तगलपल्लेवार, जागतिक आरोग्य संघटना यवतमाळ शाखेचे प्रतिनिधी डॉ. दिलीप देशमुख, जिल्हा समन्वयक डॉ. पी.एस. चव्हाण आदी उपस्थित होते.
या मोहिमेकरीता विद्यार्थ्यांचा डाटा महत्वाचा आहे, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा म्हणाले, प्रत्येक पालकांना या मोहिमेबद्दल अवगत करणे आवश्यक आहे. त्यासाठी मोबाईलवर ध्वनीचित्रफित, मॅसेज आदींचा उपयोग करावा. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील शाळा, मदरसे आदी ठिकाणच्या विद्यार्थ्यांची पूर्ण नोंदणी करा. सध्या नियमित जनजागृती सुरू आहे. मात्र मोहिमेच्या दहा दिवसांपूर्वी पुन्हा एकदा सर्व माध्यमातून, घरोघरी, शाळांमध्ये पोहचून याबाबत जनजागृती करावी, अशा सुचना त्यांनी केल्या.
गोवर - रुबेला लसीकरण मोहिमेकरीता 100 टक्के लाभार्थी नोंदणी, सर्व स्तरातील अधिकारी – कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याकरीता नियोजन करण्यात येत आहे. भारतातील 21 राज्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान 9 महिने पूर्ण व 15 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील सर्व बालकांना    गोवर – रुबेला लसीचा पहिला डोज देण्यात येईल. ही मोहीम सुमारे पाच आठवडे चालेल. सुरवातीचे दोन आठवडे प्रत्येक शाळेतील लाभार्थ्यांना डोज देण्यात येईल. त्यानंतर शाळेत न जाणा-या लाभार्थ्यांकरीता दोन आठवडे मोहीम व पाचव्या आठवड्यात उर्वरीत सर्व लाभार्थ्यांना डोज देण्यात येणार आहे. या लसीचा कोणताही दुष्परिणाम नसून ही लस घेतल्यानंतर लाभार्थीचा गोवर व रुबेला या दोन्ही रोगांपासून बचाव होईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
यावेळी समन्वयक डॉ. पी.एस.चव्हाण यांनी सादरीकरण केले. बैठकीला रोटरी, लायन्स क्लबचे प्रतिनिधी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी