14 व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींनी विकासासाठी वापरावा - पालकमंत्री मदन येरावार



v संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार वितरण समारंभ
      यवतमाळ, दि. 1 : पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी करण्यात आलेल्या 73 व्या घटना दुरुस्तीचे हे 25वे वर्ष आहे. ग्रामपंचायत हा पंचायतराज व्यवस्थेच्या विकासाचा मुख्य पाया आहे. शासनाच्या अनेक योजनांसाठी 14 व्या वित्त आयोगाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत असून गावातील गरजा पूर्ण करण्यासाठी हा निधी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी 14 व्या वित्त आयोगाचा निधी गावाच्या विकासासाठी वापरावा, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
            जिल्हा परिषदेच्या बचत भवन येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2017-18 च्या पुरस्कार वितरण सभारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जि.प.सदस्या रेणू शिंदे, उषा भोयर, आर्णि पंचायत समिती सभापती श्रीकांत जयस्वाल, पुसद पंचायत समिती सभापती देवराव मस्के, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर आदी उपस्थित होते.
            आजही 52 टक्के लोकसंख्या ही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत राहते, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेकडे 14 विषय आणि 102 योजना आहेत. यात ग्रामीण भागातील पाणी पुरवठा आणि स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विविध योजनांच्या पुरस्कारासाठी सरकारने निधी वाढविला आहे. ग्रामस्वच्छता पुरस्कारासाठी 44 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या योजनांसाठी 9 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
            पतंप्रधानांनी लाल किल्यावरून स्वच्छता, आरोग्य, खेड्यांची स्वयंपूर्णत:, शौचालयाचा वापर अशा दैनंदिन विषयाला हात घातला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली. त्यामुळे आज ग्रामस्वच्छता ही एक चळवळ सुरू झाली आहे. स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी योजनांचे महत्व नागरिकांना पटले पाहिजे. त्या केवळ कागदावर राहता कामा नये. महात्मा गांधीजींची 150 वी जयंती आपण साजरी करीत आहोत. त्यांच्या म्हणण्यानुसार खेडी स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. सर्व सोयीसुविधा जोपर्यंत खेड्यात मिळणार नाही, तोपर्यंत विकास होणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींनी आता थेट निधी उपलब्ध होत आहे. निरोगी गावासाठी कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. ग्रामस्तरावरील शासकीय कर्मचा-यांनी गावच्या विकासाच्या योजनांचा अभ्यास करावा. त्या लोकांपर्यंत पोहचवाव्यात. ओडीएफ अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाचा नागरिकांनी वापर करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
            यावेळी बोलतांना जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी आडे म्हणाल्या, ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे असते. स्वच्छता ही केवळ एक दिवसाची चळवळ नाही तर ती निरंतर असायला हवी. स्वच्छता अभियानाकडे राष्ट्रीय व सामाजिक दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
            संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत पाच लाखांचा प्रथम पुरस्कार मडकोणा (पं.स.यवतमाळ) ग्रामपंचायतीला मिळाला. मडकोनाच्या सरपंचा निलिमा घोटेकर, ग्रामसवेक एम.एस. कामडी व त्यांच्या सहका-यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, प्रमाणपत्र व रोख रक्कम देण्यात आली. 3 लाखांचा द्वितीय पुरस्कार सावंगी (पं.स.वणी) ग्रामपंचायतीला मिळाला. हा पुरस्कार सरपंच प्रविण पिदुरकर, ग्रामसेवक प्रशांत पथाडे यांनी स्वीकारला. तर 2 लाखांचा तृतीय  पुरस्कार रावेरी (पं.स.राळेगाव) येथील सरपंच राजाभाऊ तेलंगे, सचिव प्रविण निकुडे यांना देण्यात आला.
            तसेच कुटुंब कल्याण या विषयात सर्वाधिक गुण मिळवणा-या सोनुर्ली ग्रामपंचायतीला  स्व.आबासाहेब खेडकर पुरस्कार, पाणी व सांडपाणी व्यवस्थापन या विषयात सर्वाधिक गुण मिळवणा-या हर्षी ग्रामपंचायतीला स्व.वसंतराव नाईक पुरस्कार आणि सामाजिक एकता या विषयात सर्वाधिक गुण मिळवणा-या बोरी ग्रामपंचायतीला स्व.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (प्रत्येकी 25 हजार रुपये) मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती अंतर्गत बक्षीसपात्र 48 ग्रामपंचायतींना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार देण्यात आला.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी केले. संचालन कैलास राऊत यांनी तर आभार पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर यांनी मानले. यावेळी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००
           
           





           
           









Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी