आयुर्वेद ही जगाला भारताने दिलेली अद्भुत देणगी - पालकमंत्री मदन येरावार



v डॉ. जमदग्नी यांना भाऊसाहेब पद्मवार स्मृती आयुर्वेद भुषण पुरस्कार
      यवतमाळ, दि. 1 : आरोग्य हीच धनसंपदा आहे. शरीराची आणि पर्यायाने आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयुर्वेद ही सर्वोत्तम उपचार पध्दती आहे. याचे महत्व जगानेसुध्दा मान्य केले आहे. एकप्रकारे आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली अद्भुत देणगी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
            डायाभाई मावजी मजिठिया आयुर्वेद महाविद्यालय येथे डॉ. समीर जमदग्नी यांना डॉ. भाऊसाहेब पद्मवार आयुर्वेद भुषण पुरस्काराने गौरवितांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुर्वेद सेवा समितीचे अध्यक्ष केदार राठी तर प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद सदस्य डॉ. रामदास आंबटकर, सुरेंद्र पद्मवार, अशोक गिरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव मुंदाने व सत्कारमूर्ती डॉ. समीर जमदग्नी आदी उपस्थित होते.
            यवतमाळचे भुषण असलेले डॉ. भाऊसाहेब पद्मवार हे आयुर्वेदाचे महाराष्ट्रातील पहिले संचालक होते. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम भाऊसाहेबांनी अहोरात्र केले. ख-या अर्थाने त्यांनी आयुर्वेदाला लोकमान्यता आणि राजमान्यता मिळवून दिली. या महाविद्यालयाच्या निर्मितीत अनेकांचा सिंहाचा वाटा आहे. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. समीर जमदग्नी हे महान व्यक्तिमत्व आहे. हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा असून जमदग्नी यांना पुरस्कार देऊन या संस्थेचा गौरव वाढला आहे. त्यांच्या तपस्येचा हा सत्कार आहे. डॉ. जमदग्नी यांची रुग्णांप्रती असलेली आत्मीयता वाखाणण्याजोगी आहे. राज्यातील 20 हजार विद्यार्थ्यांना त्यांनी प्रात्यक्षिकासह ज्ञान वाटले आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
            तर या महाविद्यालयाचा एक माजी विद्यार्थी म्हणून या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहता आले, याचा आनंद आहे, असे विधान परिषद सदस्य डॉ. रामदास आंबटकर म्हणाले. केंद्रामध्ये आयुष मंत्रालय स्वतंत्र असल्यामुळे आयुर्वेदाला एक नवीन आयाम मिळाला आहे. हा आयुर्वेदाच्या उत्कर्षाचा काळ असून आयुर्वेद महाविद्यालयात संशोधन कार्य सुरू व्हायला पाहिजे, असेही ते म्हणाले.
            यावेळी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुर्वेद सेवा समितीचे सचिव अशोक गिरी यांनी केले. तर सन्मानपत्राचे वाचन सुरेंद्र पद्मवार यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी