ट्रॉन्सफार्मर खरेदीकरीता नियोजन समितीमधून अतिरिक्त पाच कोटी - पालकमंत्री मदन येरावार



v जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीची सभा
      यवतमाळ, दि. 20 : जिल्ह्यात वीज पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रॉन्सफार्मरची मागणी आहे. यापूर्वी जिल्हा नियोजन समितीतून 573 ट्रॉन्सफार्मरकरीता 18 कोटी मंजूर करण्यात आले होते. नादुरुस्त ट्रॉन्सफार्मर 48 तासात बदलवून देण्याचे शासनाचे धोरण आहे. ग्राहकांना वेळेवर विद्युत पुरवठा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून ट्रॉन्समार्फर खरेदी करण्याकरीता अतिरिक्त पाच कोटींचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, विधान परिषदेचे सदस्य नीलय नाईक, ख्वाजा बेग, विधान परिषद सदस्य आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी आदी उपस्थित होते.
            जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समिती ही नव्यानेच स्थापन करण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, ग्राहक आणि वीज कंपनी यांच्यात दुवा म्हणून काम करण्यासाठी ही समिती स्थापन झाली आहे. कंपनीबद्दल नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी या समितीची रचना करण्यात आली आहे. यात समाजातील विविध क्षेत्रातील नामवंतांचा समावेश आहे. जिल्ह्यात ट्रॉन्सफार्मरची मागणी मोठी आहे. सध्याचा काळ हा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या काळात शेतीला पाणी देण्यासाठी वीज पुरवठ्याची गरज आहे. त्यामुळे ट्रॉन्सफार्मर खरेदीकरीता पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल. वीज कंपनीने स्थानिक स्तरावरच ही खरेदी करावी, जेणकरून त्याचा फायदा जिल्ह्यातील नागरिकांना लवकर मिळेल, असे त्यांनी सांगितले.
नादुरुस्त ट्रॉन्सफार्मर त्वरीत दुरुस्त करून देण्यासाठी कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांनी त्वरीत कार्यवाही करावी. ट्रॉन्सफार्मरसाठी ज्यांनी पैसे भरले आहे, अशा ठिकाणी त्वरीत ते बसवून द्यावे. पुसदला 25 ट्रॉन्सफार्मरची मागणी जुनी आहे, तेथे त्वरीत ते लावण्यात यावे. सौभाग्य योजना, दिनदयाल ग्रामज्योती योजना आदी योजनांची माहिती नागरिकांना होण्यासाठी वीज कंपनीच्या अधिका-यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून मेळावे घ्यावे. या योजनांचा आढावा व प्रगतीअहवाल लोकप्रतिनिधींना दाखवावा, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी केल्या.
बैठकीला जि.प.सदस्या रेणू शिंदे, अशासकीय सदस्य म्हणून रघुनाथ कापर्तीवार, मनोज मॅडमवार, मनिष दुबे, प्रशांत दर्यापूरकर, अजय म्हैसाळकर, प्रवीण किणे यांच्यासह विद्युत कंपनीचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी