पालकमंत्र्यांनी केली दुष्काळी भागातील पिकांची पाहणी




v बाभुळगाव, कळंब आणि राळेगावमध्ये आढावा बैठक
      यवतमाळ, दि. 19 : परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे जिल्ह्यातील 9 तालुक्यांमध्ये संभाव्य दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी दुष्काळी भागातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यात बाभुळगाव तालुक्यातील चोंढी व चिमणापूर, कळंब तालुक्यातील कोठा व धनोडी आणि राळेगाव तालुक्यातील वाटखेड आणि बरड येथील गावांचा समावेश होता.
            प्रत्यक्ष पीक पाहणीनंतर बाभुळगाव, कळंब आणि राळेगाव येथील आढावा बैठकीत बोलतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, मंत्रीमंडळाचे सर्व सहकारी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शासनाला अहवाल सादर करणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. मात्र परतीच्या पावसाने दगा दिल्याने दोन पावसामध्ये मोठा खंड पडला. त्यामुळे 9 तालुक्यात संभाव्य दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंत्रणेच्या मदतीने दुष्काळ मुल्यमापनाच्या तीन टप्प्यांचे काम सुरू आहे. तसेच चक्राकार पध्दतीने महामदत ॲपच्या माध्यमातून तांत्रिक पध्दतीने सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या ॲपमध्ये प्रत्यक्ष शेतातील दुष्काळी परिस्थिती दर्शविणारे फोटो अपलोड करायचे आहेत. यात शेतमालाची वाढ, त्यावर आलेला प्रादुर्भाव, जमिनीचा पोत आदी गोष्टी समाविष्ट आहेत. संपूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन त्वरीत निर्णय घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.
            दुष्काळग्रस्त तालुक्यातील कोणत्या मंडळामध्ये अडचणी आहेत, त्याची माहिती त्वरीत सादर करावी. तसेच दुष्काळग्रस्त भागात पाणी पुरवठा योजनेचे काम युध्दपातळीवर करण्याचे शासनाचे आदेश आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे. शेतक-यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे काम अधिका-यांचे आहे. त्यानुसार अधिका-यांनी शासनाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवावी. तालुक्यांना बोंडअळी मदतीचे आलेले पैसे त्वरीत नागरिकांच्या खात्यात जमा करावे, अशा सुचना दिल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री पेयजल, राष्ट्रीय पेयजल, दिनदयाल उपाध्याय जमीन खरेदी योजना, शेतमाल तारण योजना आदींचा आढावा घेतला.
            तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी बाभुळगाव तालुक्यातील चोंढी येथील ज्ञानेश्वर कदम, चिमणापूर येथील संजय चौधरी, कळंब तालुक्यातील कोठा येथील सीमा पोकळे, धनोडी येथील राजेंद्र धोटे आणि राळेगाव तालुक्यातील वाटखेड येथील तुकाराम डंभारे व बरड येथील कांताबाई थूल यांच्या शेतावर जाऊन सोयाबीन, कपाशी आणि तूर पिकांची पाहणी केली. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, जि.प. समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विस्तार अधिकारी कैलास वानखेडे, संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी