मंजूर लाभार्थ्यांना त्वरीत कार्यारंभ आदेश द्या – जिल्हाधिकारी




v दिग्रस येथे पंतप्रधान शहरी आवास योजनेचे भुमिपूजन
यवतमाळ, दि. 25 : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरी व ग्रामीण भागात 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे हा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र व राज्य शासनाने मिशन मोडवर घेतला आहे. सुरवातीला यात अमृत शहरे व ‘ब’ वर्ग नगर पालिका समाविष्ठ करण्यात आल्या होत्या. आता मात्र सर्व नगर पालिका व नगर पंचायतींचा यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान शहरी आवास योजनेंतर्गत मंजूरी मिळालेल्या लाभार्थ्यांना बांधकामासाठी त्वरीत कार्यारंभ आदेश देण्यात यावा, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल्या.
दिग्रस शहरातील विठ्ठलनगर व पाटील नगर येथे पंतप्रधान शहरी आवास योजनेचे भुमिपूजन व लाभार्थ्यांना मंजूरी आदेश देतांना ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, नगर पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, तहसीलदार किशोर बागडे, नगर पालिका मुख्याधिकारी शेषराव टाले आदी उपस्थित होते.
मंजूरी मिळालेल्या लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम तात्काळ पूर्ण करावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, दिग्रस नगर पालिकेअंतर्गत एकूण 275 लोकांना पंतप्रधान शहरी आवास योजनेतून मंजूरी मिळाली आहे. यापैकी 10 लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम सुरू केले असून उर्वरीत 265 लाभार्थ्यांनी बांधकामाला सुरवात करावी. यासाठी त्यांना त्वरीत कार्यारंभ आदेश द्यावा. तसेच लाभार्थ्यांना शासकीय दरात रेती उपलब्ध करून द्यावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.
यावेळी विठ्ठलनगर येथील सादिक बेग रहीम बेग, माधुरी ढोले, बोरा ले आऊट येथील सुभाष जाधव, गंगानगर येथील इस्माईल खाँ जमील खाँ, श्रीरामनगर येथील चंद्रशेखर बेलसरे, लक्ष्मीनगर येथील किसन पाटमासे आदींना बांधकामाचा कार्यरंभ आदेश देण्यात आला.
पंतप्रधान शहरी आवास योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून पहिल्या डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) ला मंजूरी मिळाली आहे. यात यवतमाळ, उमरखेड, वणी, मारेगाव, महागाव, दिग्रस, नेर, घाटंजी आणि पांढरकवडा नगर पालिकांचा समावेश आहे. तर दारव्हा, आर्णि, कळंब, राळेगाव, झरीजामणी, बाभुळगाव आणि पुसद नगर पालिकांचे डीपीआर मंजूरीकरीता राज्य शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. मंजूर डीपीआर पैकी उमरखेड येथे 100 पेक्षा जास्त घरकुलाचे बांधकाम सुरू आहे.
०००००

Comments

  1. सर,प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागात नेर तालुक्या कधी सुरू होणार आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी