आरोग्य विभागामार्फत जनजागृती रॅली




v विविध उपक्रमांत सहभाग नोंदविणा-यांना बक्षीस वितरण
यवतमाळ, दि. 25 : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यामाने आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. पोस्टल ग्राऊंड येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते सायकल व पायदळ रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री. मनीष श्रीगिरीवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगलपल्लेवार, आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. अनुप कोठारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.पवार आदी उपस्थित होते.
सदर रॅली पोस्टल ग्राउंड येथून एलआयसी चौकमार्गे गार्डन रोड, बसस्टँड चौक, दत्त मंदिर, नेताजी चौक, महादेव मंदिर रोड, एलआयसी चौक व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, शासनामार्फत राबविण्यात येणारा प्रेरणा प्रकल्प, शेतकरी समुपदेशन आरोग्य सेवा कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम तळागळापर्यंत व प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे  जेणेकरून जिल्ह्यात होणा-या शेतकरी आत्महत्या थांबविता येईल. तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमामुळे जिल्हा तंबाखूमुक्त करता येईल, असेही ते म्हणाले.
२५ ऑगस्ट ते २३ ऑक्टोबपर्यंत आरोग्य विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांतर्गत जनजागृती शिबीर, आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालवधीत नेत्रदान पंधरवाडा, १० ते  १६ सप्टेंबर या कालावधीत प्रेरणा प्रकल्प शेतकरी समुपदेशन आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’, २९ सप्टेंबर जागतिक  हृदय दिन, १ ऑक्टोबर रोजी जेष्ठ नागरिक दिन, २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त कृष्ठरोग जनजागृती व तंबाखू नियंत्रण जनजागृती रॅली, 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन दिनानिमित्त विविध ठिकाणी मानसिक आजाराविषयी परिसंवाद व चर्चासत्र आयोजित करण्यात आले. तसेच १६ ऑक्टोबर रोजी महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत मानसिक आजार निदान व उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात उच्च रक्दादाब, शुगर व मौखिक कर्करोग तपासणी करण्यात आली.
आरोग्य विभागाच्या विविध उपक्रमात जनजागृती करण्याकरिता मदत करणा-या विद्यार्थी व नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देण्यात आले. यात ‘तंबाखू मुक्त शाळा अभियान’ या मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणारे कैलाश गव्हाणकर, नरेंद्र भांडारकर यांना, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल प्राचार्या उगेमुगे, डॉ. तक्षशीला मोटघरे व त्यांच्या विद्यार्थी चमूला तसेच राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमात जनजागृतीपर पथनाट्य सादर केल्याबद्दल प्रा. डॉ सिद्धार्थ गांगाळे व त्यांच्या चमूला देखील मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले. २५ ऑगस्ट ते २३ ऑक्टोबपर्यंत घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची यावेळी त्यांनी माहिती दिली. तसेच जिल्हा स्तनाला  होणा-या कर्करोगापासून मुक्त करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येईल, असेही सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मनोज सक्तेपार, डॉ. स्मिता चव्हाण, डॉ. प्रिती दुधे, तसेच  सर्व कार्यक्रम प्रमुख व कार्यक्रम समन्वयक आदींनी सहकार्य केले.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी