नरभक्षक वाघिणीचा वावर असलेल्या भागातील नागरिकांनी दक्ष रहावे - महसूल राज्यमंत्री राठोड

                                                    



v पांढरकवडा येथे घेतली आढावा बैठक
       यवतमाळ, दि. 14 : पांढरकवडा व राळेगाव तालुक्यातील वनक्षेत्रात नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्याची मोहीम वनविभागामार्फत सुरू आहे. या मोहिमेत वन विभागाला पोलिस विभाग, महसूल यंत्रणा आदींचेही सहकार्य मिळत आहे. तरीसुध्दा ही मोहीम पूर्ण होईपर्यंत वाघिणीचा वावर असलेल्या भागातील नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे, असे आवाहन महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
            पांढरकवडा येथील विश्राम गृहात राज्याचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक मिश्रा यांच्यासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पांढरकवडा वनविभागाच्या उपवनसरंक्षक अभर्णा, राज्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी जोशी आदी उपस्थित होते.
            नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगून महसूल राज्यमंत्री संजय राठोड म्हणाले, या जंगलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात झुडूपे आहेत. या झुडूपांत वन्यप्राणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी जंगलात जनावरे घेऊन जाण्याचे टाळावे. मेंढपाळ तसेच गुराखी यांनीसुध्दा चराईसाठी सध्या जंगलात जाऊ नये. कधीकधी जनावरांच्या चा-यासाठी जंगलात जावे लागते. मात्र काही दिवसांपासून या भागात नरभक्षक वाघिणीने धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे आता गायरान किंवा महसूल विभागाच्या जागेवर चा-याची व्यवस्था करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येईल. वाघिणीच्या भीतीमुळे शेतक-यांना शेतावर जाता येत नाही. यात त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या बाबींचे सर्वेक्षण करून शेतक-यांना नुकसान भरपाई देता येईल का, याबाबत मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
            तत्पूर्वी महसूल राज्यमंत्र्यांनी पांढरकवडा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात विविध विभागाची आढावा बैठक घेतली. यात भोगवटा वर्ग 2 चे भोगवटा वर्ग 1 मध्ये रुपांतर, सातबारा संगणकीकरण, संभाव्य दुष्काळी परिस्थिती, पीक विमा, तालुक्यातील शेतक-यांच्या मालाची खरेदी-विक्री प्रक्रिया, नगर पालिकेअंतर्गत विविध विकास कामे, प्रलंबित कृषी जोडणी बाबत अडचणी आदींचा आढावा घेतला. यावेळी पांढरकवडा वनविभागाच्या उपवनसंरक्षक अभर्णा, प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, तहसीलदार आर.बी. बिजे, न.प.मुख्याधिकारी प्रशांत जाधव, सहकार विभागाचे सहायक निबंधक रवी आकुलवार, तालुका कृषी अधिकारी एस.बी. कवडे, माजी आमदार विश्वास नांदेकर, जि.प.सदस्य गजानन बेजनकीवार आदी उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी