एमबीए युवकाने उभारला कुक्कुटपालन व्यवसाय


v अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे 10 लक्ष रुपयांचे कर्ज
v वर्षाकाठी चार लक्ष रुपयांचा निव्वळ नफा
यवतमाळ, दि. 29 : एखाद्या कंपनीसाठी नोकरी करण्यापेक्षा आपणच व्यवसाय उभारू शकतो, असा आत्मविश्वास असलेल्या तरुणाने नोकरी सोडून कुक्कुटपालनाचा व्यवसाय उभारला आहे. बरं हा तरुण मार्केटिंग ॲन्ड फायनांन्समध्ये व्यवस्थापन शास्त्रातील (एमबीए) पदव्युत्तर आहे. पंकज अरुण आदमाने (वय 34) असे या तरुणाचे नाव असून तो दारव्हा तालुक्यातील पांढूर्णा येथील रहिवासी आहे.  
नागपूरमध्ये शिक्षण घेतलेल्या पंकजने बी.कॉम आणि एमबीए केल्यानंतर बुट्टीबोरी एमआयडीसीतील दिनशॉ आईस्क्रीम कंपनीत नोकरी मिळविली. अनुभव आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर तो मार्केटिंग विभागात रुजू झाला. चार वर्षे दिनशॉमध्ये तर तीन वर्षे इतर कंपनीत असे एकूण सात वर्षे पंकजने नोकरी केली. पण आपण हे सर्व कंपनीकरीता करत आहोत. आपलासुध्दा व्यवसाय असावा, असा विचार त्याच्या मनात घोळत होता. अखेर नोकरी सोडून तो दारव्हा तालुक्यातील पांढूर्णा येथे आला. पंकजच्या आईच्या नावावर सात एकर शेती होती. येथे तो शेती करू लागला. शेतीसोबतच जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाचा विचार त्याने केला. जवळ असलेल्या मिळकतीतून 180 बाय 30 फुटाचे शेड उभारले. या शेडमध्ये 4 हजार 300 पक्षांची क्षमता आहे. यातून पंकजचा कुक्कुटपालन व्यवसायाचा प्रवास सुरू झाला.
कुक्कुटपालनाकरीता नागपूर येथील डेक्कन कंपनी त्याला पक्षी, त्यांचे खाद्य आणि लस पुरविते. सद्यस्थितीत एक दिवसांपासून 45 दिवसांपर्यंतचे बायलर प्रजातीचे ‘कॉब – 400’ या प्रकारचे पक्षी शेडमध्ये आहेत. दीड महिन्यानंतर कंपनीच या पक्षांची विक्री करून देते. अडीच महिन्यात एक बॅच असे वर्षातून पाच बॅचेस या कुक्कुटपालन व्यवसायातून निघत आहे. एक पक्षी दोन किलोग्रॅमचा करण्यासाठी कंपनी तीन किलो 400 ग्रॅम फिड देते. जवळपास 20 रुपये एक पक्षामागे निव्वळ नफा असल्याने एका बॅचमधून पंकजला 85 ते 90 हजार रुपये मिळतात. वर्षातील पाच बॅचेस केल्या तर हा नफा थेट साडेचार लाखांच्या घरात जातो, असे पंकजने सांगितले.
या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कुक्कुटपालनाचे नवीन शेड तो उभारत आहे. याकरीता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लाडखेड येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने त्याला 10 लक्ष रुपये कर्ज मंजूर केले आहे. 220 बाय 31 फुट आकाराचे हे शेड राहणार असून यात पक्षी क्षमता 5 हजार 200 आहे. या नवीन शेडमधून त्याला वर्षाकाठी पाच लाखांचा नफा अपेक्षित आहे. विशेष म्हणजे यापूर्वी त्याने शेतीकरीता लाडखेड येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे पीककर्ज घेतले होते. पीककर्जाची तो नियमित परतफेड बँकेला करू लागला.‍ शिवाय इनकम टॅक्स रिटर्नही तो नियमित भरत असे. त्यामुळे बँकेचा पंकजवर विश्वास बसला.
दोन मुलं आणि पत्नी नागपूर शहरातून थेट पांढुर्णाला आणून पंकज शेती आणि कुक्कुटपालनाचा व्यवसाय आनंदाने करीत आहे. दरम्यान नोव्हेंबर 2016 मध्ये आई-वडीलांचा रेल्वे अपघातात दुर्देवी मृत्यु झाल्याचा त्याने उल्लेख केला. वडील अरुण विठ्ठलराव आदमने आणि आई पद्मा हे दोघेही रेल्वेने प्रवास करीत असतांना उत्तर प्रदेशात झालेल्या रेल्वे अपघातात जवळपास 300 नागरिकांचा मृत्यु झाला होता. यात पंकजच्या आई-वडीलांचा समावेश होता. अचानक आई-वडीलांचे छत्र हरविल्यानंतरही तो जिद्दीने उभा राहिला आणि आज यशस्वीरित्या हा व्यवसाय सांभाळत आहे. *****                                                       

Comments

  1. Great pankaj@ all the best pankaj

    ReplyDelete
  2. Pankaj my best wishes 4 u really great I personally as a friend ,relative knows u and seen it hard work

    ReplyDelete
  3. Pankaj bhauji.#great work
    Heartly congratulations!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी