गावे टँकरमुक्त करण्यासाठी जलयुक्तच्या कामांचे योग्य नियोजन करा - पालकमंत्री मदन येरावार




v दुष्काळ निवारणासंदर्भात आढावा बैठक
      यवतमाळ, दि. 20 : यावर्षी यवतमाळ जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी पाणी पातळी चांगली आहे. पाझर तलाव, एमआय टँक, निळोणा, चापडोह धरण ओव्हर फ्लो झाले. गतवर्षी यवतमाळ तालुक्यातील 13 गावांत 11 टँकर सुरू होते. ही परिस्थिती यावर्षी निर्माण होऊ नये व गावे टँकरमुक्त करण्यासाठी जलयुक्तच्या कामांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारणासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य नीलय नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, यवतमाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमित राठोड, यवतमाळचे तहसीलदार शैलेश काळे, नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विस्तार अधिकारी कैलास  वानखेडे आदी उपस्थित होते.
            दोन पावसामधील खंड हा दुष्काळाला कारणीभूत आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, यवतमाळ तालुक्यात राष्ट्रीय महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 51 विहिरींना मंजूरी देण्यात आली यापैकी 47 पूर्ण झाली आहेत. तालुक्यात सत्यमेव जयते वॉटर कपचेसुध्दा काम चांगले झाले आहे. जिल्ह्यात पाण्याची पातळी वाढली मात्र सध्या ऑक्टोबर महिन्याची उष्णता बघता ती झपाट्याने खालवू शकते. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी योग्य नियोजन करा. शहरामध्ये भविष्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही, याकडे नगर पालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने लक्ष द्यावे, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.
दुष्काळग्रस्त भागातील पिकांची पाहणी : पालकमंत्री मदन येरावार यांनी दुष्काळग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली. यात यवतमाळ तालुक्यातील कोळंबी येथील गजानन चिकटे, अकोला बाजार येथील प्रफुल्ल जगताप आणि सालोड येथील विजय सिडाम यांच्या शेतातील कपाशी, सोयाबीन आणि तूर या पिकांची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रेणू शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विस्तार अधिकारी कैलास वानखेडे, गटविकास अधिकारी अमित राठोड, तहसीलदार शैलेश काळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, दुष्काळी परिस्थितीचे मुल्यमापन करण्यासाठी ‘महामदत’ या ॲपच्या माध्यमातून तांत्रिक पध्दतीने पिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या ॲपमध्ये प्रत्यक्ष शेतातील दुष्काळी परिस्थिती दर्शविणारे फोटो अपलोड करायचे आहेत. यात शेतमालाची वाढ, त्यावर आलेला प्रादुर्भाव, जमिनीचा पोत आदी गोष्टी समाविष्ट आहेत. हा अहवाल शासनाला लवकरच सादर करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी